
चेन्नई सुपरकिंग्ज संघाने मंगळवारी झालेल्या आयपीएल लढतीत सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले. पण या लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या मैदानातील वर्तणुकीवर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला. शार्दुल ठाकूरने टाकलेला चेंडू वाईड देऊ नये यासाठी महेंद्रसिंग धोनीकडून दबाव टाकण्यात आला. त्यानंतर मैदानातील पंच पॉल रायफल यांनी आपला निर्णयही बदलला. या घटनेनंतर जगभरातील चाहत्यांनी महेंद्रसिंग धोनीवर टीकेची झोड उठवली.
प्रत्यक्षात काय झाले…
शार्दुल ठाकूर 19 वे षटक टाकत होता. दुसरा चेंडू त्याने वाईड टाकला. त्यानंतरचा चेंडूही त्याने ऑफस्टम्पबाहेर टाकला. हा चेंडू वाईड देण्यासाठी पंच पॉल रायफल यांनी पुन्हा हात उचलायला सुरुवात केली. तितक्यात महेंद्रसिंग धोनीने यावर रिऍक्शन दिली. हा चेंडू वाईड नाहीए असे त्याच्या देहबोलीतून व्यक्त होत होते. त्यानंतर पंच पॉल रायफल यांनी निर्णय बदलला. यावेळी डगआऊटमध्ये बसलेला सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यानेही पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.
इम्रान ताहीरला संधी मिळेल
गेल्या मोसमात 26 फलंदाजांना बाद करीत आपली चुणूक दाखवणारा लेगस्पिनर इम्रान ताहीर यंदा अद्याप एकाही लढतीत खेळू शकलेला नाहीए. यावर चेन्नई सुपरकिंग्जचे सीईओ काशी विश्वनाथन म्हणाले, सध्या आम्ही दोन परदेशी सलामीवीर आणि दोन परदेशी अष्टपैलू खेळाडू यांनाच खेळवत आहोत. पण पुढे जाऊन खेळपट्टय़ा फिरकी गोलंदाजांना साथ देतील. त्यामुळे नजीकच्या काळात इम्रान ताहीर नक्कीच खेळेल, असा विश्वास त्यांनी पुढे व्यक्त केला.
मालवणी तडका (चेन्नई – हैदराबाद लढत)
चेन्नईन पयली बॅटिंग घेवन फक्त 167 जमयले तरी जाणत्या आणि धाकटय़ा मंडळींनी एकत्र येवन हैदराबादला 147 वरच रोखला…
बादल चौधरीच्या शब्दांत – ‘तरण्यांका लागली कळ नि जाणत्यांका इला बळ…’
(टीप – लेखक मालवणी समालोचक आहेत)




























































