IPL 2020- आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंनी नियम मोडले, राजस्थानच्या रॉबिन उथप्पा याने चेंडूला लाळ लावली

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी बीसीसीआयकडून आयपीएलदरम्यान कडक नियमांचा अवलंब करण्यात येत आहे. या स्पर्धेशी निगडित असलेल्या सर्वांसाठी ‘बायो बबल’ अर्थात जैव सुरक्षित वातावरण तयार करण्यात आले आहे. या वातावरणामधून बाहेर पडल्यास त्या व्यक्तीला कठोर शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. पण काही क्रिकेटपटूंनी नियम मोडल्याचे यावेळी दिसून आले आहे. राजस्थान रॉयल्सच्या रॉबिन उथप्पा याने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत चेंडूला लाळ लावत नियम मोडला. तसेच चेन्नई सुपरकिंग्जचा खेळाडू एम. आसिफ रूमची चावी हरवल्यामुळे हॉटेलमधील रिसेप्शनसमोर गेला. रिसेप्शनचा ‘बायो बबल’मध्ये समावेश नाहीए.

एक कोटीचा दंड अन् दोन गुणांवर पाणी

बीसीसीआयकडून ‘बायोबबल’चा नियम मोडणाऱयावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आयपीएलमधील आठही संघ मालकांना बीसीसीआयकडून एक मेल पाठवण्यात आला आहे. नियम मोडणाऱया संघाला एक कोटी रूपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच त्यांना दोन गुणांवरही पाणी सोडावे लागणार आहे. तसेच खेळाडू, त्याच्या पुटुंबीयांकडून नियम मोडला गेल्यास 60 हजार रुपयांचा दंड त्यांना भरावा लागणार आहे. ईमेलमध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

बायो बबल म्हणजे काय?

बीसीसीआयकडून आयपीएलशी निगडित कोणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ‘बायो बबल’ अर्थात जैव सुरक्षित वातावरण करण्यात आले आहे. अशा वेळी खेळाडूंसह इतर कोणाचाही बाहेरच्या जगाशी संपर्प येणार नाही. या सर्वांचे जग हॉटेल, सरावाचे मैदान व आयपीएल लढतींपुरतेच मर्यादित असणार आहे. ‘बायो बबल’चा नियम मोडणाऱयांवर कठोर
कारवाई केली जाईल.

कठोर शिक्षा

एखाद्या खेळाडूकडून पहिल्यांदा ‘बायो बबल’चा नियम मोडला गेला असेल तर त्याला क्वारंटाइन करण्यात येईल. एम. आसिफलाही क्वारंटाइन करण्यात आले होते. दुसऱयांदा खेळाडूने नियम मोडल्यास त्याला एका सामन्याच्या शिक्षेला सामोरे जावे लागेल अन् तिसऱयांदा त्याने नियम मोडल्यास आयपीएलमधून त्याला बाहेर काढले जाईल. अशा परिस्थितीत संघाला पर्यायी खेळाडू घेण्याचीही मुभा देण्यात येणार नाहीए. दरम्यान, एम. आसिफ याने क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला असून आता तो संघासोबत सराव करू शकतो.

आयसीसीकडून लाळेबाबत नियम

रॉबिन उथप्पाने चेंडूला लाळ लावली होती. यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे क्रिकेट सुरू करण्याआधी आयसीसीकडून लाळेबाबत नियम तयार करण्यात आला होता. त्यानुसार एका डावामध्ये दोन वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही खेळाडूने चेंडूला लाळ लावल्यास फलंदाजी करणाऱया संघाला 5 धावा बहाल करण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या