IPL 2021 – 18 फेब्रुवारीला लिलाव, कोणाचं नशीब फळफळणार, कोण होणार मालामाल?

जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून इंडियन प्रीमियर लीगकडे (आयपीएल) पाहिले जाते. याच आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव होणार आहे. चेन्नईमध्ये हा लिला पार पडणार असून बीसीसीआयने बुधवारी याबाबत माहिती दिली.

आयपीएलचा 13 वा हंगाम कोरोना महामारीमुळे संयुक्त अरब अमिरातमध्ये पार पडला होता. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा 5 विकेट्सने पराभव करत चषक जिंकला होता. आता कोरोनाचे रुग्ण कमी होत असून लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम स्वदेशात आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

पुढील महिन्यात इंग्लंडचा संघ हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडचा संघ कसोटी, टी-20 आणि एक दिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यानंतर आयपीएलचा हंगाम सुरु होईल.

अनेक खेळाडूंना केले रिलीज

दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या हंगामापूर्वी खेळाडूंना रिटेन करण्याची तारीख 20 जानेवारी होती, तर चार फेब्रुवारीपर्यंत ट्रेडिंग विंडो (खेळाडूंचे हस्तांतरण) करता येणार आहे. आतापर्यंत सर्वच संघांनी काही खेळाडूंना रिलीज केले आहे. आठ फ्रेंचाईजींनी 139 खेळाडूंना रिटेन केले आहे, तर 57 खेळाडूंना रिलीज केले आहे. यात मॅक्सवेल, मलिंगा, स्मिथ यासारख्या टॉपच्या खेळाडूंचाही समावेश आहे.

कोणत्या संघाकडे किती पैसे

किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक 53.20 कोटी रुपये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 35.90 कोटी, राजस्थान रॉयल्सकडे 34.85 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैद्राबादकडे प्रत्येकी 10.75 कोटी, चेन्नई सुपर किंग्जकडे 22.90 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 12.8 कोटी, मुंबई इंडियन्सकडे 15.35 कोटी रुपये आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या