आयपीएलची तयारी सुरू, परदेशी क्रिकेटपटूंच्या समावेशासाठी बीसीसीआयचे प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीसीसीआयने आयपीएलचा उर्वरीत मोसम यूएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर आता ही स्पर्धा सर्व बाजूंनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. परदेशी क्रिकेटपटूंचा यात समावेश व्हावा यासाठी बीसीसीआयकडून पाऊल उचलण्यात आले असून संघ मालकांचीही यूएईतील हॉटेल बुक करण्यासाठी लगबग दिसून येत आहे.

परदेशी क्रिकेटपटूंसाठी पर्यायाचा शोध

आयपीएलच्या उर्वरीत मोसमात परदेशी क्रिकेटपटूंचा सहभाग असावा यासाठी बीसीसीआयकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पण आंतरराष्ट्रीय दौरे किंवा इतर कारणांमुळे परदेशी क्रिकेटपटूंना यात सहभागी होता आले नाही तर अशा परिस्थितीत इतर परदेशी क्रिकेटपटूंचा पर्यायही बीसीसीआयकडून शोधण्यात येत आहे.

परदेशी क्रिकेट बोर्डांशी चर्चा

बीसीसीआय आणि परदेशी क्रिकेट बोर्ड यांच्यात चर्चा सुरू आहे. आयपीएलच्या उर्वरीत मोसमात परदेशी क्रिकेटपटूंचाही सहभाग असावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यानंतर बीसीसीआय व अमिरात क्रिकेट बोर्ड यांच्यात बोलणी होतील. कोरोनासाठीचा विलगीकरणाच्या कालावधीचाही यात विचार केला जाईल. त्यानंतर संघांतील खेळाडूंची व सपोर्ट स्टाफची यूएईला पोहोचण्याची तारीख निश्चित होईल.

हॉटेल ‘सेम’च असतील

सध्या आयपीएलच्या प्राथमिक बाबींवर चर्चा सुरू आहे. पण एका संघ मालकाच्या सूत्रांकडून या वेळी स्पष्ट करण्यात आले की, कोरोनामुळे आयपीएलचा मागील मोसम यूएईत पार पडला होता. यात सहभागी होणाऱया बहुतांशी संघ मालकांनी आपल्या खेळाडूंसाठी जे हॉटेल्समध्ये बुक केले होते बहुतांशी हेच हॉटेल्स या वेळीही ते बुक करतील. दरम्यान, बीसीसीआयकडून प्रवासाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आल्यानंतर हॉटेल्सबाबतची पुढची बोलणी होतील, असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले.