IPL 2021 मुंबई इंडियन्सचा मार्ग खडतर पण ‘सर्व शक्य आहे’, वाचा प्ले ऑफचे गणित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगचे अखेरचे काही सामने बाकी असले तरीही अद्याप प्ले ऑफचे चारही संघ ठरलेले नाहीत. आतापर्यंत फक्त तीन संघांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला असून चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात घमासान सुरू आहे.

मुंबई इंडियन्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्स संघाचा मोठ्या फरकाने पराभव केल्याने प्ले ऑफची रेस आणखी रोमांचक झाली आहे. मुंबईचे सध्या 13 लढतीत 12 गुण झाले असून रनरेट -0.048 आहे. राजस्थानचा पराभव करत मुंबईने सातव्या वरून पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचेही 13 लढतीत 12 गुण आहे. मात्र केकेआरचा रनरेट मुंबईहून चांगला आहे. केकेआरचा रनरेट +0.294 आहे, त्यामुळे प्ले ऑफ गाठण्याची नामी संधी या संघाकडेही आहे.

मुंबई इंडियन्सने राजस्थानचा दारुण पराभव केला असला तरी रोहित शर्माचा संघ अद्याप प्ले ऑफमध्ये दाखल झालेला नाही. मुंबईला आपला अखेरचा सामना हैदराबादविरुद्ध खेळायचा असून या लढतीत रोहितसेनेला मोठा विजय मिळवावा लागेल, तर राजस्थान रॉयल्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करावा अशीही प्रार्थना करावी लागेल. तसेच केकेआरने विजय मिळवला तरीही ते कमी अंतराने जिंकावे. केकेआरच्या विजयाचे अंतर 10 धावा किंवा दोन विकेट्स यापेक्षा जास्त असू नये अशीही प्रार्थना करावी लागेल.

दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघाला हैदराबादविरुद्धचा सामना मोठ्या अंतराने जिंकावा लागेल. मुंबईला हैदराबादचा 48 धावांहून अधिक किंवा 66 चेंडू बाकी असताना पराभव करावा लागेल. अशा स्थितीमध्ये मुंबईचा रनरेट कोलकातापेक्षा चांगला होईल आणि रनरेटच्या आधारे मुंबई प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.

कोलकाता नाईट रायडर्सने आपला अखेरचा सामना मोठ्या अंतराने जिंकल्यास मुंबईने आपल्या अखेरच्या लढतीत हैदराबादचा पराभव केला तरी त्यांना याचा फायदा होणार नाही. कारण केकेआरचा रनरेट मुंबईहून चांगला असेल. अशा स्थितीत दोन्ही संघांचे समान 14 गुण झाले तरी चांगल्या रनरेटच्या मदतीने केकेआर प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल.

IPL चा ‘तो’ सामना माझ्यासाठी अखेरचा असेल, निवृत्तीबाबतच्या प्रश्नाला धोनीचे स्पष्ट उत्तर

पंजाब-राजस्थान जवळपास बाहेर

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स आपले अखेरच्या लढतीत पराभूत झाले तरीही केकेआर प्ले ऑफमध्ये जाईल. कारण केकेआरचा रनरेट मुंबईहून चांगला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सकडे प्ले ऑफमध्ये प्रवेशा करण्याची संधी खूपच कमी आहे. पंजाबचा रनरेट -0.241 आहे, तर राजस्थानचा रनरेट -0.737 आहे. दोघांना प्ले ऑफ गाठण्यासाठी चमत्कारीक विजय मिळवावा लागेल.