
गतविजेता चेन्नई सुपर किंग्जचा संघ सलग दोन पराभवांनंतर स्पर्धेत विजय हॅटट्रिक साजरी करणाऱया कोलकाता नाइट रायडर्सचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलकाता सुपर फॉर्मात असल्यामुळे चेन्नईला आपल्या पराभवाची हॅटट्रिक टाळणे सोपे राहिलेले नाही. गोलंदाजीत कोलकात्याचा संघ सरस असल्यामुळे घरच्या मैदानावरही चेन्नईचा कस लागणार हे निश्चित आहे.
कर्णधार ऋतुराज गायकवाड व रचिन रवींद्र या प्रतिभावान सलामीवीरांना पॉवर प्लेमध्ये चेन्नई संघाला चांगली आणि वेगवान सुरुवात करून द्यावी लागणार आहे. शिवम दुबे वगळता इतर फलंदाज टी-20 शैलीत फटकेबाजी करण्यात कमी पडत असल्याने त्याचा चेन्नईला फटका बसत आहे. दुसरीकडे वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमान व मथीसा पथिराना मागील लढतीत खेळले नव्हते. त्याचा मोठा फटका या संघाला बसला होता. फॉर्मात असलेल्या कोलकाताविरुद्धही हे दोघे गोलंदाज खेळणार नसतील, तर मग चेन्नईचे काही खरे नाही. कारण दीपक चहर सोडल्यास त्यांचा एकही गोलंदाज छाप सोडू शकलेला नाहीये. तुषार देशपांडे व मुकेश चौधरी या वेगवान जोडगोळीसह रवींद्र जाडेजा व महेश तिक्षणा या फिरकीवीरांना आपल्या गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे.
विजयाचा चौकारासाठी कोलकाता सज्ज
स्पर्धेत आतापर्यंत अजेय असलेला कोलकात्याचा संघ गुणतालिकेत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे. विजयाच्या हॅटट्रिकनंतर हा संघ विजयाचा चौकार ठोकण्यासाठी सज्ज झालाय. सुनील नारायणकडून डावाची सुरुवात करणे या संघासाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे नारायणला लवकर बाद करण्याचे चेन्नईच्या गोलंदाजापुढे आव्हान असेल. यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्टनेही नारायणला सुरेख साथ देत कोलकात्याला वेगवान सुरुवात करून दिलेली आहे. मात्र मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर व रमनदीप सिंह यांना आपल्या लौकिकास साजेसे खेळावे लागणार आहे. आंद्रे रसल व रिंकू सिंह यांनी आपल्या हाणामारीने क्रिकेटप्रेमींचे भरपूर मनोरंजन केलेले आहे. त्यामुळे चेन्नईच्या गोलंदाजीचा या दोघांपुढे खरा कस लागणार आहे.


























































