
गतविजेता कोलकाता नाइट रायडर्स संघ ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीतून बाद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आज राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवून प्ले ऑफच्या शर्यतीला बळ देण्यासाठी या संघ मैदानावर सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे.
कोलकात्याने उर्वरित चार लढती जिंकल्या, तर 17 गुणांसह हा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत चारमध्ये राहू शकतो. क्विंटन डिकॉक व गतवर्षी प्रसिद्धीच्या झोतात आलेला रिंकू सिंग यावेळी अपयशी ठरत आहेत. शिवाय 23.75 कोटी रुपये मोजलेला वेंकटेश अय्यरही फ्लॉफ ठरल्याने कोलकाता संघ संकटात सापडलाय.
फॉर्ममध्ये असलेला कर्णधार अजिंक्य रहाणेला आता खेळाडूंना प्रेरित करून विजयाच्या मार्गावर परतावे लागणार आहे. दुसरीकडे राजस्थानने 11 लढतींत केवळ तीन विजय मिळविले असून, हा संघ स्पर्धेतून बाद झाल्यात जमा आहे. तरीही या संघातील 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष्य असेल. 35 चेंडूंत शतक ठोकून या खेळाडूने सर्वांचे लक्ष्य वेधलेले आहे. मागील सातपैकी सहा लढती गमावलेल्या या संघाकडून आता चमत्काराची अपेक्षा नसली, तरी अपेक्षांचे ओझे नसलेला हा संघ कोलकात्यासाठी धोकादायक आहे, एवढं नक्की.