
आयपीएल म्हणजे अनिश्चितता. आयपीएल म्हणजे थरार. येथे अशक्य असे काहीच नाही. गेल्या आयपीएलमध्ये पहिल्या आठ सामन्यांत सात पराभव झेलल्यानंतर बंगळुरू जवळजवळ साखळीतच गारद झाला होता. मात्र त्यानंतर उर्वरित सहा सामने जिंकत त्यांनी साखळी सामन्याच्या शेवटच्या दिवशी नेट रनरेट अवघ्या 0.167 अंकांनी चेन्नईपेक्षा सरस ठेवला आणि अनपेक्षितरीत्या प्ले ऑफ गाठले. यंदा प्ले ऑफचा फैसला सात दिवस आधीच लागला आहे आणि अव्वल चारही संघांना टॉपवर जाण्याची संधी आहे. एवढेच नव्हे तर चौघांत चौथ्या स्थानी असलेल्या मुंबईला पंजाबविरुद्ध सामना जिंपून 18 गुणांसह अव्वल स्थान काबीज करण्याची नामी संधी आहे. फक्त गुजरात, बंगळुरू आणि पंजाबला आपापल्या दोन्ही लढती गमवाव्या लागतील. असं अनपेक्षित घडलं तर मुंबई 18 गुणांसह अव्वल स्थानी विराजमान होईल. हे हवेत नाहीतर प्रत्यक्षात शक्य आहे.
सध्या आयपीएलचा साखळीचा टप्पा शेवटच्या दिशेने धावतोय. गुजरात 18 गुणांसह अव्वल स्थानी असला तरी त्यांचे स्थान लखनौने गुरुवारचा सामना जिंकल्यावर डळमळीत होऊ शकते. त्यामुळे चारही संघ प्ले ऑफमध्ये पहिला आणि दुसरा नंबर पटकावण्यासाठी संघर्षासाठी सज्ज आहेत. पुणालाही तिसरे आणि चौथे स्थान नकोय. कारण पहिल्या आणि दुसऱया स्थानावरचा संघ क्वालिफायर वन मध्ये हरला तरी अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी क्वालिफायर टूमध्ये आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करू शकतो.
टॉपवर असताना मुंबईच जिंकतेय
मुंबईने आयपीएलच्या इतिहासात आजवर फक्त चारवेळा साखळीत अव्वल स्थान काबीज केलेय आणि या चारही वेळेला ते अंतिम फेरीत पोहोचलेत. फक्त 2010 चा अपवाद वगळता 2017, 2019आणि 2020 साली त्यांनी टॉपवर राहत जेतेपदही जिंकलेय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उर्वरित दोनवेळा मुंबई दुसऱया क्रमांकावर होती आणि तेच विजेते ठरले होते. म्हणजेच मुंबई जेव्हाही टॉप टूमध्ये होती, तेव्हा विजेतीच ठरलीय.
मुंबईचा टॉपवर येण्याचा मार्ग
प्ले ऑफमध्ये पोहोचलेले तीन संघ प्रत्येकी दोन सामने खेळणार आहेत तर मुंबईचा केवळ एकच सामना शिल्लक आहे. विशेष म्हणजे गुजरात आणि बंगळुरू हे दोन्ही संघ साखळीतच बाद झालेल्या संघांशी भिडणार आहेत. त्यामुळे त्यांना दोन्ही सामन्यांत पराभवाचा धक्का बसला तर दोघांचे गुण अनुक्रमे 18 आणि 17 असतील. यानंतर मुंबईने पंजाबला नमवले तर त्यांचेही 18 गुण होतील आणि नेट रनरेटमध्ये मुंबई गुजरातपेक्षा सरस असल्यामुळे अव्वल स्थान मुंबईच्या नावावर होईल. प्ले ऑफमध्ये दाखल झालेल्या गुजरात, बंगळुरू आणि पंजाबला दोन्ही सामन्यांत धक्का बसणे अशक्य नाही. कारण त्यांच्याविरुद्ध खेळणाऱया संघांना आपला शेवट गोड करण्याचे एकमेव ध्येय उरले असल्यामुळे त्यांचा पराभव अशक्य नाही.