
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुणतक्त्यात चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्जला ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीत राहण्यासाठी आणखी एक-दोन विजयांची गरज आहे. मात्र, आज बलाढ्य लखनौ सुपर जायंट्सचा त्यांच्या मार्गात अडथळा असेल. लखनौला प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी आता ‘हारना मना है’! त्यामुळे या संघातील खेळाडू आज पंजाबविरुद्ध मैदानावर जीवाचे रान करताना दिसतील.
कर्णधार रिषभ पंतचा आऊट ऑफ फॉर्म लखनौ संघाची मुख्य समस्या होय. मात्र, एडेन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पुरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर असे एकाचढ एक फलंदाज या संघाच्या दिमतीला आहेत. याचबरोबर आवेश खान, शार्दुल ठाकुर, रवि बिष्णोई व दिग्वेश राठी अशा वैविध्यपूर्ण ताफ्यामुळे प्रतिस्पर्धी संघांसाठी लखनौविरुद्धची लढाई नक्कीच सोपी नसते.
दुसरीकडे लखनौला घरच्या मैदानावर पंजाबकडून पराभव पत्करावा लागला होता. आता परतीच्या लढतीत या पराभवाचा बदला घेण्याची संधी या संघाला असेल. पंजाबकडेही कर्णधार श्रेयस अय्यरसह प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, नेहाल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंह अशी प्रतिभावान फलंदाजांची फळी आहे.
युझवेंद्र चहलसारख्या फिरकीवीरामुळे हा संघ अतिशय धोकादायक आहे. शिवाय अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन, मार्को जॉन्सन, मार्कस स्टोइनिस अशा गोलंदाजांमुळे लखनौचा संघ कमालीचा संतुलित वाटतो. मात्र, 10 पैकी पाच लढती गमावलेला हा संघ गुणतालिकेत सध्या सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी या संघाला आता प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे.