घरात विजयगर्जनेसाठी बंगळुरू सज्ज, आज पंजाबविरुद्ध विजय नोंदविण्यासाठी आरसीबी उत्सुक

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर ‘शेर’ असणारा रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ घरच्या मैदानावर मात्र आतापर्यंत ‘भिगी बिल्ली’ ठरत आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर एकही सामना न गमावणारी आरसीबी घरच्या मैदानावरील पहिल्या विजयासाठी आसुसलेली आहे. त्यामुळे उद्या पंजाबविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून हा दुष्काळ संपवण्यासाठी आरसीबी सज्ज झाली आहे, तर 112 धावांचे छोटे आव्हान असतानादेखील कोलकात्याचा पराभव करून मनोधैर्य उंचावलेला पंजाबचा संघ उद्या आरसीबीविरुद्ध तगडे आव्हान उभे करण्यासाठी मैदानात उतरणार यात तीळमात्र शंका नाही.

दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा आयपीएलचा हंगाम आरसीबीसाठी बहारदार ठरत आहे. आरसीबीचे फलंदाज फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार हे प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना पुरून उरत आहेत, तर गोलंदाजीमध्ये जॉस हेझलवूड, भुवनेश्वर कुमार, कृणाल पंडय़ा हे भेदक मारा करत आहेत. त्यामुळे आरसीबीने प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्या घरात जाऊन धोबीपछाड करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे. आरसीबीने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील सर्व सामन्यांत विजय मिळवला आहे, मात्र अद्याप आरसीबीला घरच्या मैदानावर विजय गवसलेला नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पंजाबचा पराभव करून आरसीबी घरच्या मैदानावर देखील आपणच ‘किंग’ असल्याचे साध्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे कोलकाताविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी निराश केल्याने पंजाबचा डाव 111 धावांत गडगडला होता, मात्र युझवेंद्र चहल आणि माकाx यान्सन यांनी तुफानी गोलंदाजी करत कोलकाताच्या फलंदाजीचा कणा मोडत 112 धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखत विजय खेचून आणला होता. या विजयामुळे पंजाबच्या संघाचे मनोबल नक्कीच उंचावलेले आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात पंजाब आरसीबीपुढे तगडे आव्हान उभे करणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.