पहिला नंबर कुणाचा? आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’ प्रवेशाची स्पर्धा अधिक तीव्र

आयपीएलमध्ये आठ संघांना अव्वल चार संघांत स्थान मिळवण्याची संधी असल्यामुळे येत्या आठवडय़ात प्ले ऑफची स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात पहिला नंबर कुणाचा लागतोय याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. सध्या खेळत असलेल्या  सात संघांची गुणसंख्या 18 किंवा त्यापेक्षा अधिक होत असल्यामुळे जो संघ सर्वप्रथम 18 गुण मिळवेल त्याचाच प्ले ऑफमध्ये सर्वप्रथम प्रवेश होईल. त्यामुळे बंगळुरू विरुद्ध लखनौ यांच्यातील लढतीनंतरच पहिल्या प्रवेशाचा फैसला लागेल. तोपर्यंत क्रिकेटप्रेमींना थोडासा धीर धरावा लागेल.

आयपीएलमध्ये नेहमीप्रमाणे प्ले ऑफची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. हैदराबाद विरुद्ध दिल्ली लढतीत पावसाने घातलेल्या घोळामुळे हैदराबादचा खेळ संपला आहे. त्यामुळे तीन संघ स्पर्धेतून बाद झाले असून अद्याप सात संघांना प्ले ऑफ गाठण्याची संधी आहे. टी-20 चा खेळ इतका अनपेक्षित आहे की, सध्या अव्वल स्थानावर असलेला बंगळुरूचा संघही पुढील तिन्ही सामने हरला तर स्पर्धेतून बाद होऊ शकतो. त्यामुळे आता वर्तवलेली सारी भाकिते पुढच्या आठवडय़ात तोंडावर आपटू शकतात. तर सध्या सातव्या क्रमांकावर असलेला संघ सलग तीन विजयांमुळे अव्वल स्थानही हिसकावून घेऊ शकतो. त्यामुळे कुणाबद्दलही अंदाज वर्तवणे मुर्खपणाचे ठरू शकते.

प्ले ऑफसाठी काहीही घडू शकते

गेल्या आयपीएलमध्ये सलग सहा पराभवांमुळे बंगळुरूचा संघ स्पर्धेतून जवळजवळ बाद झाला होता. मात्र या संघाने पराभवाच्या षटकारानंतर विजयाचा अनपेक्षित षटकार खेचत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता आणि नेट रनरेटच्या लढाईत चेन्नईवर 0.067 इतक्या कमी अंशांनी बाजी मारत प्ले ऑफ गाठण्याचा पराक्रमही केला होता. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सातपैकी कोणतेही चार संघ प्ले ऑफ गाठू शकतात. फक्त बंगळुरू, मुंबई, पंजाब आणि गुजरात या संघांना अधिक संधी आहे, असे आपण तूर्तास म्हणून शकतो.

विजयाची नवमीच फैसला करणार

बंगळुरूने आठ विजय मिळवलेत तरी ते प्ले ऑफ गाठू शकले नाहीत. सध्या ते प्ले ऑफच्या उंबरठय़ावर आहेत. त्यांची पुढची लढत 9 मे रोजी लखनौविरुद्ध रंगणार आहे. जर या लढतीत तो जिंकला तर  प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा त्यांचा संघ पहिला असेल. मात्र लखनौने बाजी मारली तर अडचणी आणखी वाढतील. मग जो संघ सर्वप्रथम नववा विजय मिळवेल तोच प्ले ऑफमध्ये एण्ट्री करील. मुंबईची उद्या गुजरातविरुद्ध लढत असून जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत पुढे जाईल, मात्र त्याचे प्ले ऑफचे स्थान पक्के होणार नाही. त्यामुळे प्ले ऑफचे  टॉप पह्र नेहमीप्रमाणे नेट रनरेटच्या संघर्षानंतरच निश्चित होतील.