
ज्याची अवघ्या क्रिकेटविश्वाला आतुरता होती त्या हिंदुस्थानी क्रिकेटचा ‘रनोत्सवा’चा अर्थातच आयपीएलच्या फटकेबाजीचा थरार शनिवारपासून सुरू होतोय. त्यात नेहमीप्रमाणे षटकार–चौकारांची आतषबाजी होणार, विक्रमांचा पाऊस पडणार. काही संघ जेतेपद पटकावण्यासाठी उतरणार, तर काही आजवर भंगलेले स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करणार. तसेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशा थरारक वातावरणात आयपीएलचा 19 वा हंगाम आरसीबी विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या धमाकेदार सामन्याने सुरू होत आहे.
उद्घाटनातच हायव्होल्टेज संघर्ष
गतविजेता आरसीबी आपल्या घरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रणशिंग फुंकणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीने गेल्या वर्षी 18 हंगामांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला होता. आता जेतेपद राखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. न्यूझीलंड मालिकेनंतर मिळालेल्या विश्रांतीनंतर कोहली पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल. हैदराबादही मोठय़ा धावसंख्यांसाठी ओळखला जात असल्याने उद्घाटन सामना ‘रनोत्सव’ ठरण्याची चिन्हे आहेत.
कोण बाजी मारणार
एपंदरीत आयपीएल 2026 हा फक्त क्रिकेट हंगाम नाही, तर ‘हिंदुस्थानी क्रिकेटचा रनोत्सव’ आहे. जिथे प्रत्येक चेंडूवर थरार, प्रत्येक षटकात नाटय़ आणि प्रत्येक सामन्यात इतिहास घडण्याची शक्यता आहे. पुढील 65 दिवसांत कोण उंचावणार ट्रॉफी, कोण मोडणार विक्रम आणि कोण ठरणार नवा हीरो याची उत्सुकता शिगेला पोहोचेलच. पण क्रिकेटप्रेमींना आपल्या आवडत्या खेळाडूचा भन्नाट खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे कोणते हीरो खरंच हीरो ठरतात आणि कोण झीरो शून्यातून बाजी मारतो, याचे अंदाज बांधायला क्रिकेटप्रेमींनी सुरुवात केलीय.
प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी दिग्गज सज्ज
चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आयपीएलचे दोन दिग्गच पाच वेळा विजेते ठरलेत तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा आयपीएलला गवसणी घातली आहे. आता हे संघ पुन्हा मैदानात उतरणार आहेत. या तिन्ही संघांकडे मिळून तब्बल 13 जेतेपदे आहेत. मात्र गेल्या हंगामात अपेक्षाभंग झाल्याने यंदा प्रतिष्ठा परत मिळवण्याची जिद्द अधिक तीव्र आहे. गेल्या वर्षी मुंबईने प्ले ऑफ गाठले असले तरी अजून सुधारणा आवश्यक आहे, तर चेन्नई आणि केकेआरला अनुक्रमे तळातून वर यावे लागणार आहे. आणखी एक ट्रॉफी जिंकून आयपीएल इतिहासात सर्वात यशस्वी संघ बनण्याची शर्यत यंदा पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.
नव्या चेहऱ्यांसह नवी रणनीती
यंदा संघरचनेत मोठे बदल झाले आहेत. चेन्नईने संजू सॅमसन, मॅट हेन्री आणि नूर अहमद यांना संघात घेत नवी ताकद मिळवली आहे. महेंद्रसिंग धोनीकडून कदाचित अखेरचा जादुई हंगाम पाहायला मिळू शकतो. कोलकात्याने टिम सिफर्ट, फिन अॅलेन, रचिन रवींद्र आणि पॅमेरून ग्रीन यांना घेत फलंदाजी मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणे नेतृत्व करत संघाला एकत्र ठेवेल, तर रिंकू सिंह फिनिशरच्या भूमिकेत चमकण्यास सज्ज आहे. वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरीन हे गोलंदाजीतले तुरपाचे पत्ते असले तरी वेगवान गोलंदाजी त्यांची कमकुवत बाजू आहे. कोणते बदल संघाचा चेहरामोहरा बदलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पहिल्या जेतेपदासाठी पावशील का…
आयपीएलच्या गेल्या 18 मोसमांत दिल्ली पॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या तिन्ही संघांना जेतेपदाचा देव अजून पावलेला नाही. त्यांची प्रतीक्षा संपणार की अजून लांबणार, हे त्यांच्या खेळावर अवलंबून असले तरी देव आणि दैवाची साथ असल्याशिवाय त्यांना हे गाठता येणे अशक्य आहे. त्यामुळे आता तरी जेतेपदाच्या देवा पाव असे साकडे हे तिन्ही संघ घालताहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे आणखी एक जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत. औकिब नबी, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर यांसारखे नवोदित खेळाडू या पीचवर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत.





























































