
आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना दुखापतींचे ग्रहण लागले आहे. कोलकाता नाईट रायडर्सपासून ते राजस्थान रॉयल्सपर्यंत अनेक दिग्गज संघांचे खेळाडू जायबंदी झाल्याने फ्रँचायझींसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सॅम करन, आकाश दीप आणि हर्षित राणा यांसारख्या महत्त्वाच्या खेळाडूंनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने संघांचे गणित बिघडले असून, आता त्यांच्या जागी पर्यायी खेळाडू शोधण्यासाठी व्यवस्थापनाची धावपळ सुरू झाली आहे.
दुसरीकडे, काही खेळाडू पूर्ण स्पर्धेतून बाहेर नसले तरी सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहेत. यामध्ये मथीशा पथिराना, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांसारख्या स्टार गोलंदाजांचा समावेश आहे. पथिरानाच्या पोटरीला टी-२० विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होती, तर स्टार्क आणि कमिन्स यांना वर्कलोड मॅनेजमेंट आणि किरकोळ दुखापतींमुळे सुरुवातीच्या सामन्यांत विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात चाहत्यांना अनेक प्रमुख खेळाडूंच्या खेळाला मुकावे लागणार आहे.
…तर राजस्थान रॉयल्सला कोणीही रोखू शकणार नाही, अश्विनचा विरोधी संघांना धडकी भरवणारा इशारा
या दुखापतींमुळे केवळ संघांचेच नाही तर खेळाडूंच्या वैयक्तिक कारकिर्दीवरही परिणाम झाला आहे. विशेषतः टी-२० विश्वचषकानंतर खेळाडूंवर आलेला कामाचा ताण हे या दुखापतींचे मुख्य कारण मानले जात आहे. बीसीसीआय आणि संबंधित क्रिकेट बोर्डांकडून खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत सतत वैद्यकीय अपडेट्स घेतले जात आहेत. आगामी काळात आणखी काही खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत चित्र स्पष्ट होईल.
आयपीएल २०२६ मधून पूर्णपणे बाहेर पडलेले खेळाडू
- सॅम करन (RR): जांघेची दुखापत
- हर्षित राणा (KKR): गुडघ्याची शस्त्रक्रिया
- आकाश दीप (KKR): पाठीची स्ट्रेस इन्जुरी
- नॅथन एलिस (CSK): हॅमस्ट्रिंगची दुखापत
- ॲडम मिल्ने (राजस्थान रॉयल्स): हॅमस्ट्रिंगची दुखापत
- जॅक एडवर्ड्स (SRH): पायाची दुखापत
- अथर्व अंकोलेकर (MI): गुडघ्याची दुखापत
काही सामन्यांसाठी उपलब्ध नसलेले खेळाडू
- मथीशा पथिराना (KKR): पोटरीला ताण (एप्रिल मध्यापर्यंत बाहेर)
- मिचेल स्टार्क (DC): वर्कलोड मॅनेजमेंट (सलामीचा सामना)
- पॅट कमिन्स (SRH): पाठीची दुखापत (सलामीचा सामना)
- जोश हेझलवूड (RCB): हॅमस्ट्रिंग (सलामीचा सामना)
- वानिंदू हसरंगा (LSG): हॅमस्ट्रिंग (सलामीचा सामना)
- मॅथ्यू शॉर्ट (CSK): अंगठ्याची दुखापत (सुरुवातीचे सामने)
- लॉकी फर्ग्युसन (PBK): वैयक्तिक कारण (सलामीचा सामना)
- जोश इंग्लिस (LSG): वैयक्तिक रजा (सलामीचा सामना)
- मयंक यादव (LSG): स्नायूला ताण (सलामीचा सामना)
- ईशान मलिंगा (SRH) आणि मोहसिन खान (LSG): वैद्यकीय स्थिती अद्याप अस्पष्ट
























































