
BCCI ने आयपीएल २०२६ चा पारंपारिक उद्घाटन सोहळा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शनिवारी (28 एप्रिल 2026) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना रंगणार आहे, मात्र त्यापूर्वी कोणताही सोहळा होणार नाही. गेल्या वर्षी 4 जून 2025 रोजी बंगळुरूमध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत 11 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. या मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी यंदा कोणताही सांस्कृतिक किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी 4 जून रोजी घडलेल्या दुःखद घटनेमुळे आम्ही आयपीएल 2026 च्या सुरुवातीला कोणताही औपचारिक सोहळा आयोजित करत नाही आहोत. त्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.” यामुळे यंदा आयपीएलची सुरुवात अत्यंत साध्या पद्धतीने आणि गांभीर्याने केली जाणार आहे.
उद्घाटन सोहळा रद्द झाला असला तरी, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल 31 मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी एका भव्य सांगता समारंभाचे नियोजन करत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, हंगामाचा शेवट दणक्यात करण्यासाठी बीसीसीआयने विशेष तयारी सुरू केली आहे. म्हणजेच, क्रिकेट चाहत्यांना सुरुवातीला मनोरंजनाला मुकावे लागले तरी, स्पर्धेच्या शेवटी मात्र मोठा सोहळा पाहायला मिळणार आहे.






























































