
इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाची तयारी सध्या जोमात सुरू आहे. फ्रेंचायझींना 15 नोव्हेंबर पूर्वी रिटेन्शन यादी जाहीर करायची असून या निमित्ताने आपापसात ट्रेडिंगही सुरू आहे. याच दरम्यान, आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने मोठा डाव टाकला आहे.
मुंबई इंडियन्स मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज करण्याची दाट शक्यता आहे. मुंबईचा संघ लखनौ सुपर जायंट्ससोबत ट्रेड करण्याच्या तयारीत असून अर्जुनच्या बदल्यात शार्दुल ठाकूर याला आपल्या संघात सामील करण्यास उत्सुक आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आर. अश्विन यानेही आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना अनावधानाने उल्लेख केल्याने यास दुजोरा मिळत आहे.
मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघ आपापसात ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूची देवाण घेवाण करण्याच्या तयारीत आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरच्या बदल्यात लॉर्ड शार्दुल ठाकूर याची मागणी केली आहे. आर. अश्विन यानेही याची पुष्टी केली आहे.
आर. अश्विन म्हणाला, मुंबईकडून कोणताही खेळाडू रिलीज होताना दिसत नाही. पण दीपक चहर याला बदली खेळाडू शोधणे त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. कारण तो दुखापतग्रस्त आहे. मुंबईने एसएसजीसोबत ट्रेड करत शार्दुलला सुरक्षित केले आहे. तसेच मुंबईचा संघ एका फिरकीपटूचाही शोध घेत आहे, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, आयपीएल 2025 पूर्वी झालेल्या मेगा लिलिवात शार्दुल ठाकूरवर एकाही संघाने बोली लावली नव्हती. मात्र मोहसीन खान दुखापतग्रस्त झाल्याने एसएसजीने शार्दुलला करारबद्ध केले. शार्दुलने पहिल्या दोन लढतीत 6 विकेट्स घेत सुरुवात झोकात केली, मात्र कामगिरीत सातत्य राखण्यात त्याला अपयश आले. संपूर्ण स्पर्धेत त्याने 10 लढतीत 13 विकेट्स घेतल्या. तर 2023 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकर याने मुंबई इंडियन्सकडून पाच सामने खेळले असून यात त्याला फक्त 3 विकेट्स घेता आल्या होत्या. मेगा लिलिवात मुंबईने त्याला 30 लाखांच्या बेस प्राईजला घेतले होते.


























































