
राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने क्रिकेट विश्वाला थक्क केले आहे. केवळ 15 वर्षांच्या या खेळाडूने मैदानावर दाखवलेला आत्मविश्वास पाहून दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनने त्याचे भरभरून कौतुक केले. स्टेनच्या मते, वैभवने आपल्या आक्रमक शैलीने गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली असून, डेल स्टेन म्हणाला, “त्याने गोलंदाजांवर असा मनोवैज्ञानिक दबाव टाकला आहे की, चेंडू थोडाही चुकला तर तो सीमारेषेबाहेर जाईल, ही धास्ती आता प्रत्येकाला वाटू लागली आहे.”
या सामन्यात जगातील सर्वोत्तम गोलंदाज मानल्या जाणाऱ्या जसप्रीत बुमराहवरही वैभवच्या फलंदाजीचा दबाव दिसून आला. स्टेनने ESPNCricinfo शी बोलताना निरीक्षण नोंदवले की, वैभवला गोलंदाजी करताना बुमराहने फुलटॉस चेंडू टाकला, जो त्याच्यासारख्या अचूक गोलंदाजाकडून क्वचितच पाहायला मिळतो. “कदाचित बुमराहच्या मनातही हीच भीती होती की जर चेंडू चुकला, तर हा मुलगा षटकार मारेल. जेव्हा एखादा गोलंदाज असा विचार करू लागतो, तेव्हा त्याच्याकडून चुका होतात आणि वैभवने त्याच चुकीचा फायदा घेत चेंडू प्रेक्षकांत भिरकावून दिला,” असे विश्लेषण स्टेनने केले.
फॉरमॅट बदलामुळे आयपीएलला हजारो कोटींचा फटका, मूळ कराराचा भंग केल्याचा ललित मोदींचा आरोप
वैभवची सर्वात मोठी ताकद त्याची निडरता असल्याचे स्टेनने प्रामुख्याने नमूद केले. तो कोणत्याही मोठ्या नावाचा विचार न करता केवळ चेंडूच्या गुणवत्तेवर खेळतो. मग समोर बुमराह असो किंवा इतर कोणीही, जर हाफ चेंडू मिळाला तर तो थेट स्टेडियमबाहेरच जातो. अवघ्या 15 व्या वर्षी ताजपूरसारख्या ठिकाणाहून येऊन आयपीएलमध्ये अशा प्रकारची दहशत निर्माण करणारा वैभव सूर्यवंशी हा बिहारच्या स्वप्नांचा नवा चेहरा बनला असून, हार्दिक पांड्या देखील त्याच्या या निर्भीड खेळाचा चाहता झाला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध वैभवने जसप्रीत बुमराहला 2, ट्रेंट बोल्टला 2 आणि शार्दुल ठाकूरला एक षटकार ठोकला होता.


























































