
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचा उर्वरीत मोसम यूएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला. आता या स्पर्धेच्या तारखांबाबत बीसीसीआयच्या सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. उर्वरीत आयपीएलचा मोसम 19 सप्टेंबरपासून खेळवण्यात येण्याची शक्यता असून 15 ऑक्टोबरला या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला होईल. मात्र अद्याप या तारखांबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून पुढे स्पष्ट करण्यात आले की, बीसीसीआय व अमिरात क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात आयपीएलच्या उर्वरीत मोसमाबाबत चर्चा झाली आहे. ईसीबीकडून स्पर्धा आयोजनाबाबत विश्वास दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयला या स्पर्धेसाठी 25 दिवसांचा कालावधी हवा होता. सध्यातरी 19 सप्टेंबरपासून ही स्पर्धा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच 15 ऑक्टोबरला या स्पर्धेचा अंतिम सामना होण्याची शक्यता आहे.
परदेशी क्रिकेट बोर्डांशी चर्चा सुरू
आयपीएलमध्ये परदेशी क्रिकेटपटूंचा सहभाग असावा यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. परदेशी क्रिकेटपटूंच्या सहभागानंतर स्पॉन्सर्स, जाहिराती यांसारख्या बाबींमध्ये लक्षणीय वाढ होईल हे लक्षात घेऊन बीसीसीआयने यासंदर्भात परदेशी क्रिकेट बोर्डांशी चर्चा केली आहे. आयपीएलमध्ये जास्तीत जास्त परदेशी क्रिकेटपटू असायला हवेत यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.























































