राजस्थान घेणार ‘मंकडिंग’चा बदला

27
ipl-rajsthan-vs-punjab

सामना ऑनलाईन । चंदिगढ

‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील पहिली लढत ‘मंकडिंग’ प्रकरणाने गाजली होती. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केले म्हणून सामना पंजाबला जिंकता आला, नाहीतर निकाल वेगळाही लागला असता. सामना संपल्यानंतर बटलरने अश्विनसोबत हातही मिळविला नव्हता. सामन्यानंतर चार-पाच दिवस या ‘मंकडिंग’ प्रकरणाने क्रिकेटविश्व ढळवून निघाले होते. आता चंदिगढमध्ये मागील महिन्यातील पराभवाचा बदला घेण्याची राजस्थानला संधी असेल.

‘आयपीएल’च्या गुणतालिकेत पंजाब 8 गुणांसह चौथ्या स्थानी असून, राजस्थान रॉयल्स 4 गुणांसह सातव्या स्थानी आहे. मात्र, राजस्थानने मागील लढतीत मुंबई इंडियन्ससारख्या तगडय़ा संघाला पराभूत करून आम्हीही कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूलाही राजस्थानने हरविलेले आहे. राजस्थानकडे कर्णधार अजिंक्य रहाणे, जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, बेन स्टोक्स, राहुल त्रिपाठी असे प्रतिभावान फलंदाज आहेत. पंजाबच्या गोलंदाजी ताफ्याची भिस्त मोहम्मद शमीवर आहे. याचबरोबर कर्णधार रविचंद्रन अश्विन, सॅम कुरन असे सामन्याला कलाटणी देणारे गोलंदाजही पंजाबच्या दिमतीला आहेत. मात्र, यावेळी राजस्थानचे फलंदाज पंजाबच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करण्यासाठी आतुर झालेले असतील. दुसरीकडे पंजाबने राजस्थान, मुंबई, दिल्ली कॅपिटल व हैदराबाद या संघांना पराभूत केले आहे. त्यांच्याकडे लोकेश राहुल, ख्रिस गेल या धडाकेबाज सलामीच्या जोडीसह डेव्हिड मिलर, मयांक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंग व सॅम कुरन अशी खोलवर फलंदाजांची फळी आहे. मात्र, राजस्थानकडेही धवल कुलकर्णी, जोफ्रा आर्चर, कृष्णाअप्पा गौतम, बेन स्टोक्स, श्रेयस गोपाल असा वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा ताफा आहे. त्यातच मागील लढतीतील ‘मंकडिंग’ प्रकरणामुळे राजस्थान-पंजाबमधील उद्याची लढत म्हणजे खुन्नस का मामला असेल.

आपली प्रतिक्रिया द्या