
काही दिवसांपूर्वीच आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेत यूएईला बायबाय करीत हिंदुस्थानकडे प्रयाण करणाऱ्या सुरेश रैनाने बुधवारी या सर्व प्रकरणावर मौन सोडताना सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. माझ्यासमोर कौटुंबिक प्रश्न उभा ठाकला होता. हा विषय माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे मायदेशात परतण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मला 12.5 कोटी रुपये मिळतात. इतकी मोठी रक्कम सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेण्याचे कारणही मोठे होते. मात्र आता मी येथेही सराव करीत आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये आयपीएल खेळण्यासाठी युएईलाही जाऊ शकतो, असे सुरेश रैना यावेळी स्पष्टपणे म्हणाला.
सीएसके माझे कुटुंब अन् माही माझा भाऊ
हॉटेलमध्ये बाल्कनी नसलेली रूम न दिल्यामुळे सुरैश रैना तडकाफडकी मायदेशी परतल्याचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन श्री. निवासन यांनीही नाराजी व्यक्त केली. यावर सुरेश रैना म्हणाला, हिंदुस्थानात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी कठीण होता. चेन्नई सुपरकिंग्ज माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे. माही अर्थातच धोनी माझ्या भावाप्रमाणे आहे. माझ्यात आणि चेन्नई सुपरकिंग्जमध्ये कोणताही वादविवाद नाहीए. १२.५ कोटी सोडून मी मायदेशी येतो, तेव्हा कारणही तेवढेच मोठे असू शकते हे सर्वांना समजायला हवे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. पण आयपीएलमध्ये आणखी चार ते पाच वर्षे खेळू शकतो, असेही ठामपणे तो म्हणाला.
श्रीनिवासन यांना मायदेशी परतण्याचे खरे कारण समजले
चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांच्याबाबत सुरेश रैना म्हणाला, ते माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यांनी मला नेहमीच मुलासारखे वागवले आहे. आयपीएल सोडण्याचे मुख्य कारण त्यांना माहीत नव्हते. तरीही आपल्या मुलाला ओरडण्याचा हक्क वडिलांना आहे. पण आता त्यांना खरे कारण समजले आहे. आता ते माझ्यासोबत आहेत.
मुलांना भेटलेलो नाही
माझे कुटुंब माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. मला काही झाले, तर त्यांचे काय होणार याची चिंता सातत्याने सतावत होती. मी माझ्या मुलांना 20वस बघितलेही नाही. आताही हिंदुस्थानात आल्यानंतरही क्वारंटाइनमध्येच आहे. त्यामुळे त्यांची भेट अद्याप झालेली नाही, असेही सुरेश रैना सांगतो.




























































