धोनी-कोहली सलामीला भिडणार ; ‘आयपीएल’चे पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाराव्या हंगामातील दोन आठवड्यांचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. 5 एप्रिलपर्यंत होणार्‍या पहिल्या टप्प्यातील या स्पर्धेला 23 मार्चला चेन्नईमध्ये गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स या संघातील लढतीने प्रारंभ होणार आहे. लोकसभा निवडणूक व ‘आयपीएल’ टी-20 क्रिकेट स्पर्धा हे दोन महासोहळे एकाच वेळी येत आहेत. त्यामुळे ‘आयपीएल’च्या गव्हर्निंग बॉडीने लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर उर्वरित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

खरे तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ‘आयपीएल’चे वेळापत्रक जाहीर होणार होते, मात्र लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम ठरल्यानंतर आपले वेळापत्रक जाहीर करण्याचे ‘आयपीएल’ने ठरवले होते. तरीही ‘आयपीएल’च्या गव्हर्निंग बॉडीने अचानक मंगळवारी दोन आठवड्यांपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले.  मे-जूनमध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक क्रिकट स्पर्धेमुळे आयपीएल यंदा मार्च महिन्याच्या अखेरच्या आठकड्यापासून सुरू करण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला होता. त्यातच हिंदुस्थानमध्ये लोकसभेची निवडणूक असल्याने यंदाची ‘आयपीएल’ परदेशात घेण्याबाबतही विचार सुरू होता, मात्र मोठा खर्च टाळण्यासाठी शेवटी ही स्पर्धा मायदेशातच खेळविण्याबद्दल शिक्कामोर्तब झाले.