
बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात धडक कामगिरी करणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा महाराष्ट्र पोलीस दलातील पाच वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे लांडे आता त्यांचे मूळ पॅडर असलेल्या बिहार पोलिसांच्या सेवेत परतणार आहेत.
डिसेंबर 2016 मध्ये शिवदीप लांडे प्रतिनियुक्तीवर पाच वर्षांकरिता महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. उपायुक्त म्हणून एएनसीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी ड्रग्ज माफियांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी कारवाया करत कोटय़वधी किंमतीचे ड्रग्ज पकडले, तर अनेक तस्करांना गजाआड धाडले. त्यांनी निरीक्षक संतोष भालेकर यांच्यासह कोटय़वधी किंमतीचे फेंटानिल ड्रग्ज पकडण्याची कामगिरी केली होती.
एएनसीमधील लांडे यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. साडेतीन वर्षे एएनसीमध्ये काम केल्यानंतर त्यांची उपमहानिरीक्षकपदी बढती झाली आणि त्यांना एटीएसमध्ये नियुक्त करण्यात आले. एटीएसमध्येदेखील त्यांनी चांगले काम केले. निरीक्षक भालेकर यांच्या मदतीने बंदी असलेला नैसर्गिक युरेनियमचा साठा पकडला होता. देशातील ही पहिलीच मोठी कारवाई ठरली होती. एटीएसमध्ये त्यांनी दीड वर्ष काम केले.































































