सौदी अरेबियातील अमेरिकन हवाई तळावर इराणचा हल्ला; 12 अमेरिकी सैनिक जखमी, 2 गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी इराणने सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेस या अमेरिकन हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात किमान 12 अमेरिकी सैनिक जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ‘रॉयटर्स’ने अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.

या ताज्या हल्ल्यानंतर 28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात जखमी झालेल्या अमेरिकी सैनिकांची संख्या 300 च्या पुढे गेली आहे. यापैकी सुमारे 273 सैनिक पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. आतापर्यंत 13 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

हा क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त हल्ला अमेरिकेच्या हवाई संरक्षण व्यवस्थेतील सर्वात गंभीर भेदांपैकी एक मानला जात आहे. या हल्ल्यात किमान दोन KC-135 एरियल रिफ्युएलिंग विमानांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती अमेरिकन अधिकाऱ्यांनी The New York Times ला दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, “या युद्धादरम्यान इराणने मध्यपूर्वेतील विविध अमेरिकन तळांवर सतत हल्ले केले आहेत. बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर करून अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.” या हल्ल्यांमुळे US Central Command ला हजारो सैनिक सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले असून काहींना युरोपपर्यंत स्थलांतरित करण्यात आले आहे.

बहुतेक इराणी हल्ले अमेरिकन आणि मित्रदेशांच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी अडवले असले तरी ‘शाहेद’सारख्या स्वस्त आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या ड्रोनमुळे संरक्षण व्यवस्थेवर ताण येत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

यापूर्वीच्या घटनांमध्ये Shuaiba Port (कुवेत) येथे ड्रोन हल्ल्यात ६ अमेरिकी रिझर्व्ह सैनिकांचा मृत्यू झाला होता, तर 1 मार्च रोजी प्रिन्स सुलतान तळावर आणखी एका सैनिकाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, जखमी झालेल्या सुमारे 225 अमेरिकी सैनिकांना क्षेपणास्त्र स्फोटांमुळे मेंदूला दुखापत (ट्रॉमॅटिक ब्रेन इंज्युरी) झाली आहे. त्यापैकी बहुतेक सैनिक पुन्हा सेवेत दाखल झाले असून सुमारे 3५ सैनिक अजूनही उपचार घेत आहेत.

या संघर्षात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. अहवालानुसार, इराण मध्ये 1,492 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत, लेबनॉन मध्ये 1,11० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, आखाती देशांमध्ये 50 पेक्षा जास्त मृत्यू नोंदवले गेले आहेत, तर इस्रायली हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

मध्यपूर्वेतील हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असून पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.