इराण थांबेना! इस्रायलच्या तीन हेरांना फासावर लटकवले, अन्य 700 अटकेत

इस्रायल व अमेरिकेने लादलेले युद्ध स्वतःच्या अटी-शर्तींवर थांबवल्यानंतरही इस्रायलच्या बाबतीत इराण कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाही. इस्रायलच्या गुप्त कारवायांच्या विरोधात इराणने मोहीमच उघडली आहे. युद्धबंदीच्या दुसऱयाच दिवशी इस्रायलच्या तीन गुप्तहेरांना फासावर लटकवले आहे. तसेच अन्य 700 संशयितांना अटक करून कडक संदेश दिला आहे.

तब्बल 12 दिवसांच्या तुंबळ संघर्षानंतर मंगळवारी इराण-इस्रायलमधील युद्ध थांबले. त्यानंतर इराणने आपल्या परीने इस्रायलला दणके देणे सुरूच ठेवले आहे. इस्रायलच्या छुप्या कारवायांवर इराणची करडी नजर असून युद्धबंदीनंतर लगेचच इस्रायलविरुद्धचा राग काढला आहे. इस्रायलची गुप्तचर संघटना मोसादचे हस्तक म्हणून काम करणाऱ्या व शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱया तिघांना इराणने देहदंडाची शिक्षा दिली आहे, तर इस्रायलशी संबंधांच्या संशयावरून 700 जणांना अटक केली आहे. इस्रायल आणि इराणमध्ये अनेक दशकांचे वैर आहे.