
मध्यपूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेसह हिंदुस्थानच्या कृषी निर्यातीवरही दिसू लागला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या असून पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने गॅसची टंचाईही निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये तेल आणि गॅसचा साठा संपण्याच्या स्थितीत असल्याचेही समोर आले आहे.
या संघर्षाचा परिणाम हिंदुस्थानच्या तेल साठ्यावरही झाला आहे. मात्र तेल-गॅसपुरतेच नुकसान मर्यादित नसून व्यापारावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. कारण हार्मूझ सामुद्रधुनीमार्गे हिंदुस्थान अनेक देशांना तांदूळ आणि इतर अन्नधान्य निर्यात करतो. या मार्गावरील अडथळ्यांमुळे निर्यात ठप्प होत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
बासमती तांदळाची निर्यात ठप्प
अमेरिका-इस्रायल-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर हिंदुस्थानचा बासमती तांदळाचा निर्यात व्यापार जवळपास ठप्प झाला आहे. नाकेबंदी आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे पश्चिम आशियातील बाजारांसाठी पाठवले जाणारे तांदळाचे मोठे साठे अनेक बंदरांवर अडकले आहेत.
होर्मूज सामुद्रधुनी जवळपास पूर्णपणे बंद झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. हा मार्ग हिंदुस्थानमधून इराण आणि आखाती प्रदेशात जाणाऱ्या तांदळाच्या मोठ्या शिपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काही अहवालांनुसार सुमारे 4 लाख टन बासमती तांदूळ हिंदुस्थानच्या बंदरांवर किंवा समुद्रमार्गावर अडकून पडला आहे.
शेतकऱ्यांना मोठा फटका
बासमती तांदळाच्या निर्यातीवर परिणाम झाल्यामुळे स्थानिक बाजारात किंमतीत मोठी घसरण झाली आहे. छोट्या तांदूळ गिरणी मालकांना निर्यातदारांकडून मिळणारी किंमत आधीच 8 ते 9 टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील आठवड्याच्या शेवटी किंमतीत काहीशी सुधारणा झाली असली तरी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत अजूनही सुमारे 5 टक्के घसरण आहे.
याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. लहान गिरणी मालकांना धान्य विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुमारे 9 टक्क्यांनी घट झाली आहे.
पुढील काळात नुकसान वाढण्याची शक्यता
पंजाब बासमती राईस मिलर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजीत सिंह जोसन यांनी सांगितले की, युद्धामुळे छोट्या गिरणी मालकांकडून स्थानिक बासमती तांदूळ खरेदी जवळपास थांबली आहे. यामुळे निर्यात व्यापारावर गंभीर परिणाम झाला आहे.
त्यांच्या मते, सध्या धान्याच्या किमतीत 8 ते 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र युद्ध आणखी एक-दोन महिने सुरू राहिले तर शेतकऱ्यांना धान्य विक्री किमतीत 10 ते 15 टक्क्यांची घट सहन करावी लागू शकते.
हिंदुस्थानच्या कृषी निर्यातीवर धोका
ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या आकडेवारीनुसार, युद्धामुळे हिंदुस्थानच्या कृषी निर्यातीचा मोठा हिस्सा धोक्यात आला आहे. 2025 मध्ये पश्चिम आशियाई बाजारपेठ हिंदुस्थानच्या एकूण कृषी निर्यातीपैकी सुमारे पाचव्या भागाइतकी म्हणजे 11.8 अब्ज डॉलर इतकी होती.
या प्रदेशात निर्यात होणाऱ्या प्रमुख कृषी उत्पादनांमध्ये तांदळाचा मोठा वाटा आहे. हिंदुस्थानच्या एकूण तांदूळ निर्यातीपैकी सुमारे 36.7 टक्के हिस्सा पश्चिम आशियातील देशांकडे जातो.
या देशांकडे मोठी निर्यात
हिंदुस्थान दरवर्षी सुमारे 60 लाख टन बासमती तांदूळ निर्यात करतो. त्यापैकी जवळपास दोन तृतीयांश निर्यात पश्चिम आशियातील देशांकडे होते. इराण, इराक, येमेन, सीरिया, सौदी अरेबिया, जॉर्डन, लेबनॉन, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात हे हिंदुस्थानी बासमती तांदळाचे प्रमुख बाजार मानले जातात.























































