इराण आणि इस्रायल युद्धात कोणता देश कोणाच्या सोबत आहे, जागतिक नेत्यांनी काय म्हटले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त एअरस्ट्राइकनंतर मिडल ईस्टमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही बहरीन, अबू धाबी, दुबई आणि रियाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांवर प्रतिहल्ला केल्याने जगभरातील नेत्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून संपूर्ण जग दोन गटांत विभागले गेल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचे समर्थन करत इराणच्या जनतेला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “इराणी जनतेने आता आपल्या नशिबावर स्वतःचे नियंत्रण मिळवावे आणि इस्लामिक नेतृत्वाच्या विरोधात उभे राहावे.” अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रांना लक्ष्य करण्याचे संकेत दिल्याने तणाव अधिक वाढला आहे.

रशियाने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेवर टीका करताना म्हटले की, “शांतता प्रस्थापित करण्याच्या अमेरिकेच्या गप्पा केवळ एक नाटक आहे.” रशियाने म्हटले आहे की, वॉशिंग्टन आणि तेल अवीव या भागाला मानवी आणि आर्थिक विनाशाच्या उंबरठ्यावर ढकलत आहेत. रशियाने आपल्या नागरिकांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश दिले आहेत.

यातच ईयू प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अणुकेंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. परिस्थिती गंभीर असल्याने ईयूने आपल्या निम-गरजेच्या कर्मचाऱ्यांना या भागातून परत बोलावले आहे. तर ब्रिटनने स्पष्ट केले की, ते या संयुक्त हल्ल्यात सामील नव्हते. तणाव कमी करण्यासाठी त्यांनी चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले असून आपल्या नागरिकांची सुरक्षा हीच त्यांची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.

आफ्रिकन युनियन आणि रेड क्रॉस

आफ्रिकन युनियनने चेतावणी दिली आहे की, या युद्धामुळे जागतिक अस्थिरता निर्माण होऊन आफ्रिकेच्या आर्थिक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. तर ‘इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस’ने हा संघर्ष एक भयानक चेन रिएक्शन सुरू करू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.