गॅस तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद! व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने किचनकोंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखातात भडकलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला असून त्याचा सर्वात मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचे वितरण थांबवण्यात आल्याने त्यावर बिसंबून असलेल्या हॉटेल्सची कोंडी झाली असून मुंबई तब्बल 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्याची आफत ओढवली आहे. हे प्रमाण पुढच्या काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता असून हॉटेलमध्ये खायचे वांदे होणार आहेत.

युद्धाचा गॅस पुरवठा साखळीला फटका बसला आहे. हिंदुस्थानात गॅसचा तुटवडा वाढत चालला आहे. व्यावसायिक वापराच्या गॅस विक्रीवर निर्बंध आणले गेले आहेत, तर घरगुती वापराच्या गॅस विक्रीबाबतही नवे नियम करण्यात आले आहेत. त्यानुसार महिन्यातून केवळ एकच गॅस सिलिंडर ग्राहकांना मिळणार आहे. या निर्बंधांचे झटके बसू लागले असून हॉटेल्स व्यावसायिक हादरून गेले आहेत.

n गॅसशिवाय हॉटेलचे किचन चालूच शकत नाही. त्यामुळे गॅस तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत मुंबईतील 50 टक्के हॉटेल्स बंद ठेवावी लागतील, असे ‘आहार’ या हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

n आहार संघटना पेंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधणार असून संघटनेचे प्रतिनिधी उद्या राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे करणार असे संघटनेने नमूद केले.

सरकारने हस्तक्षेप करावा

सरकारने गॅस सुरळीत असल्याचा दावा केला, तरी प्रत्यक्षात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याचे हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनांच्या महासंघाने म्हटले आहे. व्यावसायिक सिलिंडर पुरवठा रोखण्याच्या 5 मार्चच्या सरकारी आदेशाचा हवाला देऊन वितरकांनी सिलिंडर पुरवठा रोखला आहे. सरकारने याबाबत हस्तक्षेप करून स्पष्ट आदेश जारी करावेत, असे महासंघाचे सरचिटणीस जयसन चाको यांनी म्हटले आहे.

ऑनलाइन सिलिंडर बुकिंग होईना!

मुंबईत अनेक ग्राहकांना सिलिंडर बुक करण्यात अडचणी येत आहेत. ऑनलाइन सिलिंडर बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास विनंती मान्य केली जात नाही. ‘तांत्रिक कारणामुळे आम्ही तुमची मागणी नोंदवू शकत नाही,’ असे सांगितले जात आहे. इंधनाचा तुटवडा नसल्याचे एसएमएस कंपन्यांकडून पाठवले जात आहेत, मात्र सिलिंडर बुक होत नाही. त्यामुळे याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम आहे.