
इस्रायल-अमेरिका आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर हे युद्ध आणखीनच भडकले आहे. दोन्ही बाजूने क्षेपणास्त्र, ड्रोनद्वारे हल्ले केले जात असून यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच रशिया आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवरून चर्चा केल्याचे समोर आले आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. 3मार्च रोजी रशिया आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी फोनवर चर्चा केली. अमेरिकेने आणि इस्रायलने केलेल्या विनाकारण सशस्त्र आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन होत असून याचे संपूर्ण मध्य पूर्व भागाला अत्यंत गंभीर परिणाम होतील, यावर दोन्ही मंत्र्यांनी जोर दिला, असी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
Ministry of Foreign Affairs, Russia (@mfa_russia) posts, “On March 3, FMs of Russia & Iran spoke over the phone. The Ministers stressed that the unprovoked armed aggression by the US & Israel undermines the fundamental norms of international law & entails the gravest consequences… pic.twitter.com/MCg7pTtHL1
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2026
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी मंगळवारी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मध्य पूर्वेतील युद्ध थांबवून तणाव कमी करण्याचे आवाहन केले, अशी माहिती मॉस्कोच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. गेल्या काही दिवसांत इराणच्या प्रतिहल्ल्याचा फटका बसलेल्या काही आखाती देशांनी आपल्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. या देशांची बाजू तेहरानपर्यंत पोहोचवण्यास राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी संमती दर्शवल्यानंतर हा फोन कॉल झाला.
युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर पाश्चात्य देशांकडून रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत पुतिन यांनी मध्य पूर्वेतील देशांशी भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला असून इराण आणि आखाती देशांशी त्यांनी जवळचे संबंध राखले आहेत. याच पार्श्वभूमीवर हा फोन कॉल झाला.
अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर केलेले हल्ले आणि त्यानंतर इराणने आखाती देशांवर व इस्रायलवर केलेले प्रतिहल्ले यामुळे अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आहे. यामुळे आखाती देशांमधील हजारो विमान फेऱ्या रद्द झाल्या असून कोविड महामारीनंतर जागतिक प्रवासातील हा सर्वात मोठा व्यत्यय ठरला आहे. आखाती देश हे रशियन पर्यटकांचे आवडते सुटीचे ठिकाण असल्याने याचा मोठा फटका बसला आहे. सध्या सुमारे 50 हजार रशियन पर्यटक संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकले असण्याची शक्यता असून त्यांच्या सुटकेसाठीही प्रयत्न केले जात आहेत.
























































