
सीरियामध्ये तेलाची वाहतूक करण्याच्या आरोपावरून जिब्राल्टर किनाऱ्यावर इराणचा तेल टँकर ताब्यात घेण्यात आला होता. इराणच्या ग्रेस-1 सुपर टँकर जहाजावर तैनात असणाऱ्या एका हिंदुस्थानी कॅप्टनसह चार क्रू मेंबरची गुरुवारी सुटका करण्यात आली.
ब्रिटिश नौसैनिकांनी 4 जुलै रोजी इराणचे तेल टँकर जहाज जिब्राल्टर सरकारच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सीरियावर युरोपियन युनियनने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून तेलाची वाहतूक करण्यात येत असल्याने इराणच्या ग्रेस-1 टँकर आणि त्यावर असणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची सुटका करण्यात आली असून त्यांच्यावर सुरू असलेली पोलीस कारवाईदेखील थांबविण्यात आली आहे.
सीरियाला इराणकडून होत असलेल्या तेल पुरवठय़ाबाबत अमेरिकेनेदेखील तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात जिब्राल्टर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यातच इराणनेदेखील ब्रिटन सरकारकडे तेलाचे जहाज सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.





























































