
इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना हवाई हल्ल्यात ठार करून अमेरिकेने जगभरात खळबळ निर्माण केली आहे. या हल्ल्याने चवताळलेल्या इराणने अमेरिकेला धडा शिकवण्याची धमकी देत कारवाईला सुरुवात केली आहे. तर इराणच्या कारवाईमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले असून त्यांनी इराणमधील 52 ठिकाणे उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. मात्र, याचवेळी इराकने अमेरिकेला मोठा झटका दिल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकी सैनिकांना इराकमधून बाहेर काढण्याचा प्रस्ताव इराकच्या संसदेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावामुळे ट्रम्प यांचा तिळपापड झाला असून इराकने अमेरिकी सैनिकांना इराकच्या बाहेर पडण्यास भाग पाडल्यास इराकला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणारे इराण आणि इराक एकत्र आल्याने ट्रम्प यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
अमेरिकेच्या कठोर इशाऱ्यानंतरही सुलेमानी यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा इराककडून निषेध करण्यात येत आहे. तसेच अमेरिकी सैनिकांना इराकच्या बाहेर काढून अप्रत्यक्षपणे इराणला पाठिंबा देण्याची भूमिका इराकने घेतली आहे. संसदेत मंजूर झालेल्या या प्रस्तावाची इराकने अंमलबजावणी केल्यास इराणवर लष्करी कारवाई करण्यात अमेरिकेला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. इराकमधून अमेरिकी सैन्याला बाहेर काढून आपल्या हवाई हद्दीचा वापर करण्यास इराकने अमेरिकेवर बंदी घातल्यास इराणवर हल्ला करणे अमेरिकेला कठीण होणार आहे. इराक, पाकिस्तान, तुर्कस्तान आणि अफगाणिस्तान या देशांच्या सीमा इराणशी जोडलेल्या आहेत. त्यातच सुलेमानींच्या हत्येचा पाकिस्ताननेही निषेध केला आहे. तसेच कोणत्याही देशाला युद्धासाठी आपल्या जमीनीचा वापर करू देणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. तुर्कस्ताननेही सुलेमानी यांची हत्या अयोग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अमेरिकेला फक्त सौदी अरेबियाची मदत मिळण्याची शक्यता आहे.
इराण आणि इराकचे शत्रुत्त्व हा जगातील चर्चेचा विषय ठरला आहे. 80 दशकात दोन्ही देशांमध्ये झालेल्या युद्धाचे दूरगामी परिणाम झाले आहेत. मात्र, सुलेमानींच्या मृत्यूनंतर ही दोन शत्रू राष्ट्रे एकत्र आल्याचे दिसत आहे. इराकवर सद्दाम हुसैन यांचे शासन असताना इराकने इराणविरोधात भूमिका घेतली होती. इराकमध्ये इसिसचे प्राबल्य वाढल्यानंतर अमेरिकेने तेथे सैन्य पाठवले. त्यानंतर इराक अमेरिकेवर निर्भर राहू लागला. मात्र, आता इसिसचा खात्मा झाला आहे. त्यामुळे सुलेमानींच्या मृत्यूनंतर इराकने अमेरिकेविरोधात भूमिका घेतली आहे. इराण हा शियाबहुल मुस्लीम देश आहे. तर इराकमध्ये शिया आणि सुन्नी यांची समान संख्या आहे. सद्दाम हुसैन कट्टरवादी सुन्नी होते. तर इराकचे आताचे पंतप्रधान अब्दुल अल मंहदी शिया असून ते इराणच्या रिपब्लिक विचारधारेचे समर्थक आहेत. तसेच त्यांचे वडील शिया धर्मगुरु होते. त्यामुळे आता इराकने इराणच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. सुलेमानी यांच्या हत्येने जगभारातील शिया समुदाय एकवटल्याचे दिसत आहे. मात्र, इराकच्या संसदेत मंजूर झालेल्या या प्रस्तावाची कितपत अंमलबजावणी होते आणि अमेरिकेचे पुढील धोरण काय असेल, यावर अमेरिका-इराण संघर्षाची पुढील दिशा ठरणार आहे. सध्यातरी सुलेमानींच्या मृत्यूनंतर इराण-इराक हे शत्रू एकत्र आल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्याचे मानण्यात येत आहे.





























































