
इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इराणने कतार आणि ओमान या मध्यस्थी करू पाहणाऱ्या देशांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जोपर्यंत इस्रायलच्या हल्ल्याला पूर्णपणे उत्तर दिले जात नाही, तोपर्यंत कोणतीही शस्त्रसंधीची चर्चा केली जाणार नाही, अशी माहिती या चर्चेशी संबंधित एका अधिकाऱ्याने रॉयटर्सला दिली आहे. (Iran refuses ceasefire talks under Israeli assault, says official).
‘इराणने कतार आणि ओमान या मध्यस्थांना सांगितले की, इस्रायलच्या अगोदरच्या हल्ल्याला उत्तर देऊन झाल्यानंतरच शस्त्रसिंधीचा विचार केला जाईल’, असे त्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
त्या अधिकाऱ्याने पुढे स्पष्ट केले की, ‘हल्ले सुरू असताना इराण कोणत्याही प्रकारच्या चर्चेस तयार नाही’.
शुक्रवारी सकाळी इस्रायलने इराणवर हल्ला करून इराणच्या लष्करातील उच्चपदस्थ नेत्यांचा खात्मा केला आणि त्याच्या अणुऊर्जा प्रकल्पांवरही मोठे नुकसान केले. या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढवली जाईल, असेही इस्रायलने जाहीर केले आहे.
इराणनेही या कारवाईला तीव्र प्रत्युत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करत ‘नरकाचे दरवाजे उघडू’ असा इशारा दिला आहे.
इराणने अमेरिका, ओमान किंवा कतारच्या माध्यमातून शस्त्रसंधीसाठी किंवा अणुकराराच्या नव्या वाटाघाटींसाठी विनंती केली आहे, असे काही मीडिया अहवाल समोर आले होते. मात्र, त्या गोष्टी खोट्या असून, इराणने अशी कोणतीही मागणी केलेली नाही, असेही त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
रॉयटर्सने इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि ओमानच्या माहिती मंत्रालयानेही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.