
अमेरिका व इस्रायलशी निकराची झुंज देणारा इराण आता इरेला पेटला आहे. कोणत्याही परिस्थितीत मागे न हटण्याचा निर्धार इराणने केला आहे. ‘‘खामेनींच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना सोडणार नाही,’’ अशी धमकीच इराणच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख अली लारीजानी यांनी आज दिली.
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध कमालीचे चिघळले आहे. इराण चिवटपणे लढत असल्याने अमेरिका व इस्रायलनेही हल्ले सुरूच ठेवले आहेत. अमेरिकेने शनिवारी रात्री इराणची राजधानी तेहरान व आसपासच्या परिसरांवर बॉम्बवर्षाव करून तेलाचे पाच डेपो उडवून दिले. या हल्ल्यानंतर झालेल्या स्पह्टांनी संपूर्ण तेहरान हादरून गेले. शहरात आगडोंब उसळला. यात दोन टँकर चालकांसह 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले. इराण सरकारने तातडीने हालचाली करून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. देशाचे तेलसाठे सुरक्षित असल्याचेही इराण सरकारने लगेचच स्पष्ट केले. देशात परिस्थिती नियंत्रणात आणतानाच प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रालयच्या हायफा खाडीतील रिफायनरीवर खैबर शेकान हे बॅलिस्टिक मिसाइल डागले. यात रिफायनरीचे मोठे नुकसान झाले. इस्रायलला हा आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.
तेल डेपोंवर हल्ले करून अमेरिका व इस्रायलने घोडचूक केली आहे. हा हल्ला म्हणजे इराणी जनतेविरुद्ध पुकारलेले रासायनिक युद्ध आहे. इराणमधील पर्यावरणाबरोबरच मानवी जिवांना याचा मोठा फटका बसणार आहे. अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे हे युद्ध धोकादायक वळणावर पोहोचले आहे. हे संकट इराणच्या सीमेपुरते मर्यादित राहणार नाही, असा संताप इराण सरकारने व्यक्त केला.
व्हेनेझुएलाप्रमाणे इराणही ताब्यात घेऊ असे ट्रम्प यांना वाटले होते, पण त्यांचा डाव फसला आहे. आता त्यांची सुटका नाही. आम्ही खामेनी आणि हजारो नागरिकांना गमावले आहे. ही साधी गोष्ट नाही. ट्रम्प यांना मोठी किंमत चुकवावी लागेल.
नव्या नेत्यालाही संपवण्याचा इस्रायलचा इशारा
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यालाही संपवून टाकू असा इशारा इस्रायलने दिला. इराणमधील दहशतवादी राजवट पुन्हा देशाचा ताबा घेण्याच्या प्रयत्नात आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. नव्या नेत्याला आणि त्याची निवड करणाऱयांनाही लक्ष्य करू, असे इस्रायली लष्कराने सांगितले.
कुवेतने कच्च्या तेलाचे उत्पादन थांबवले!
इराणकडून सातत्याने होणाऱया हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कुवेतच्या राष्ट्रीय तेल कंपनीने कच्च्या तेलाचे उत्पादन तूर्त थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कुवेतच्या या निर्णयामुळे तेलाची पुरवठा साखळी विस्कळीत होणार आहे. परिणामी जगभरात तेलाचा तुटवडा निर्माण होणार असून त्यामुळे महागाई भडकण्याची शक्यता आहे.
खामेनींचा उत्तराधिकारी ठरला! नाव गुप्त ठेवले
अयातुल्ला खामेनी हे मारले गेल्यानंतरही अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना तोडीस तोड उत्तर देणाऱया इराणने नव्या सर्वोच्च नेत्याची निवड केली आहे. असेम्ब्ली ऑफ एक्सपर्टस्ने नव्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र हा नेता कोण हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. असेम्ब्लीच्या सचिवालयाकडून योग्य वेळी नव्या नेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. इराणमध्ये सर्वोच्च नेत्याचा शब्द अंतिम असतो. सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च नेत्याची निवड महत्त्वाची मानली जात आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्धचे युद्ध थांबणार की लांबणार हे नव्या नेत्याच्या निर्णयावर अवलंबून असेल.
सलग सहा महिने लढण्याची तयारी
इराण विरुद्ध पूर्ण ताकदीने लढत राहण्याच्या इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या वक्तव्यावर इराणने प्रत्युत्तर दिले. ‘आम्हीही तयार आहोत. पुढचे सलग सहा महिने ताकदीने लढण्याची आमची तयारी आहे,’ असे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे. अमेरिका-इस्रायलच्या 200 हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावाही इराणने केला.
इस्रायलच्या हायफा रिफायनरीवर हल्ला
तेहरानमधील तेल डेपोंवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना इराणने इस्रायलला दणका दिला. इस्रायलच्या सर्वात मोठय़ा हायफा रिफायनरीवर मिसाइल डागले. इस्रायलवर खैबर, इमाद, गदर या क्षेपणास्रांचा मारा करण्यात आला. हिजबुल्लानेही इस्रायलच्या अनेक शहरांवर रॉकेट हल्ले चढवले आहेत.



























































