
मध्य पूर्वेतील युद्धात दिवसागणिक नवनवीन घडामोडी घडत, हे युद्ध अधिक चिघळताना दिसत आहे. अशातच आता इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी एका लिखित संदेशाद्वारे, अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात दिलेल्या पाठिंब्याबद्दल इराकच्या जनतेचे आभार मानले आहेत, असे इराणी प्रसारमाध्यमांनी रविवारी सांगितले. माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांची २८ फेब्रुवारी रोजी युद्धाच्या सुरुवातीलाच एका हवाई हल्ल्यात हत्या झाली होती. (त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर) नवे सर्वोच्च नेते म्हणून नाव जाहीर झाल्यानंतरही मोजतबा खामेनी अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत; त्यांनी केवळ मोजकेच लिखित निवेदने जारी केली आहेत.
ते प्रत्यक्ष समोर न आल्यामुळे, त्यांची प्रकृती आणि ते सध्या कुठे आहेत याबद्दल तीव्र तर्कवितर्क सुरू झाले आहेत. मात्र, सरकारी दूरदर्शन आणि काही इराणी अधिकाऱ्यांनी असे संकेत दिले आहेत की, हवाई हल्ल्यात झालेल्या जखमांमधून ते सध्या सावरत आहेत. लिखित संदेशामार्फत त्यांनी इराकचे आणि इराकमधील जनतेचे आभार मानले आहेत. इराणवरील आक्रमणाविरुद्ध इराकने घेतलेली भूमिका याकरता त्यांनी इराकच्या सर्वोच्च धार्मिक प्राधिकरणाचे आभार मानले आहेत. हे आभार मानताना त्यांनी इराकच्या जनतेचे देखील आभार मानले आहे.
इराकचा ‘इस्लामिक सर्वोच्च परिषद’ आणि बगदादमधील इराणी राजदूत यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा संदेश देण्यात आला, असेही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
हा संदेश नेमका कशा प्रकारे पाठवण्यात आला, याबद्दल मात्र अधिक तपशील देण्यात आले नाहीत. सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती झाल्यापासून, मोजतबा खामेनी यांनी सर्वोच्च नेते म्हणून पहिले निवेदन आणि पर्शियन नववर्ष, नवरोजसाठी एक संदेश प्रसिद्ध केला आहे.






















































