Iran US Israel War – इराणहून हिंदुस्थानकडे येणाऱ्या विमानावर अमेरिकेचा हल्ला, 1 एप्रिलला दिल्लीत होणार होतं दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये गेल्या महिन्याभरापासून युद्ध सुरू आहे. 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धामुळे आखातातील देशही होरपळून निघाले असून या युद्धाच्या झळा जगभरातील देशांनाही बसत आहेत. यामुळे जगातील अनेक प्रमुख देशांनी हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. तरीही दोन्ही बाजूने तुफान हल्ले सुरू आहेत. अशातच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या महान एअरलाईन्सचे एक विमान निकामी झाल्याचे वृत्त आहे.

इराणचे हे विमान आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि मदत सामग्री घेण्यासाठी दिल्लीला येणार होते. एक एप्रिल रोजी हे विमान दिल्लीमध्ये दाखल होणार होते, मात्र तत्पूर्वी सोमवारी मशहद विमानतळावर झालेल्या अमेरिकन हवाई हल्ल्यात या विमानाचे नुकसान झाले आहे. यामुळे हिंदुस्थानकडून मानवतावादी मदत आणण्याच्या मोहिमेत अडथळा निर्माण होऊ शकतो, असा दावा इराणी अधिकाऱ्यांनी केला आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

अमेरिकेने इराणमधील मशहद विमानतळावर सोमवारी मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महान एअरलाईन्सच्या एका विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. हा हल्ला झाला तेव्हा हे विमान दिल्लीकडे उड्डाण घेण्याच्या तयारीमध्ये होते. इराणच्या सरकारी सूत्रांनीही यास दुजोरा दिला असून अमेरिकेच्या हल्ल्यात महान एअरचे एक विमान निकामी झाल्याचे त्यांनी म्हटले.

महान एअरलाईन्सचे हे विमान या आठवड्यात नवी दिल्लीला रवाना होणार होते. इराणी जनतेसाठी 11 टनांहून अधिक आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि मदत सामग्री घेऊन येण्याची जबाबदारी या विमानावर होती. हे विमान 1 एप्रिल रोजी नवी दिल्लीत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र तत्पूर्वीच अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात विमानाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी अद्याप या दाव्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

आखाती युद्धात भडकाभडकी सुरूच! ट्रम्प यांची धमकी! इराण पूर्ण उद्ध्वस्त करू

पहिली खेप 18 मार्चला रवाना

दरम्यान, हिंदुस्थानने 18 मार्च रोजी ‘इराणी रेड क्रेसेंट सोसायटी’च्या माध्यमातून वैद्यकीय पुरवठ्याची पहिली खेप इराणला पाठवली होती. या मदतीबद्दल नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने हिंदुस्थानी जनतेचे आभारही मानले होते.

इराणचे प्रत्युत्तर, शत्रूला पूर्ण नेस्तनाबूत करू!