
संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) शनिवारी इराणकडून करण्यात आलेल्या ताज्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दुबई आणि अबू धाबीमध्ये मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. या हल्ल्यांचा थेट परिणाम हवाई वाहतुकीवर झाला असून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ड्रोनने धडक दिली. सुदैवाने, या ड्रोन हल्ल्याचा प्रभाव मर्यादित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, हवेतच अडवण्यात आलेल्या एका क्षेपणास्त्राचा ढिगारा विमानतळ परिसरात कोसळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुबईचे हवाई क्षेत्र पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहे.
या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात व्यस्त समजल्या जाणाऱ्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका कॉन्कोर्सचे नुकसान झाले असून चार कर्मचारी जखमी झाले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन टर्मिनल रिकामे करण्यात आले असून प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. फ्लाइट-ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म ‘Flightradar24’ नुसार, या संकटामुळे दुबईकडे येणारी अनेक विमाने आकाशात घिरट्या घालत होती, तर काहींचे आगमन लांबणीवर पडले होते. तत्पूर्वी, शुक्रवारी दुबई आणि कतारमधील नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर मिसाईल थ्रेट अलर्ट प्राप्त झाले होते. कतार सरकारने आपल्या नागरिकांना धोका टळल्याचे सांगून आश्वस्त केले असले तरी युएईमध्ये मात्र तणाव कायम आहे.
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील हा संघर्ष आता दुसऱ्या आठवड्यात शिरला असून, याची सुरुवात 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याने झाली होती. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्यपूर्वेतील आठ देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. या संघर्षात युएईला मोठ्या प्रमाणावर झळ सोसावी लागत असून संपूर्ण प्रदेशात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

























































