ना हक्काची शेती, ना रोजगार; इर्शाळवाडी दरडग्रस्तांच्या नशिबी दोन वर्षांनंतरही नरकयातनाच

इर्शाळवाडीमध्ये दोन वर्षांपूर्वी महाकाय दरड कोसळून 84 जण मृत्युमुखी पडले होते. या घटनेस प्रदीर्घ काळ उलटला तरी अजूनही दरडग्रस्तांच्या नशिबी नरकयातनाच आहेत. अजूनही सर्व गरजूंना घरे मिळाली नाहीत. त्यांच्या हाताला कामच नसल्याने उपासमारीची वेळ आली असून अनेक महिला मोलमजुरी करीत आहेत. हक्काची शेतीही दरडीने गिळल्याने आता कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा तरी कसा, या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

19 जुलै 2023 या दिवसाची आठवण काढली तरी दरडग्रस्तांच्या अश्रूचा बांध फुटतो. आपल्या आप्तेष्ठांच्या आठवणीने रात्रीची झोपही त्यांना येत नाही. सरकारने ४३ घरे बांधून दिली. पण कोणत्याही सुविधा नसल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रोजगारच नसल्याने विजेचे बिल भरतानादेखील नाकीनऊ येत आहे. दरडीखाली नाचणी, वरी, भात पिकवणारी हक्काची शेती नष्ट झाली. दरड कोसळल्यानंतर सरकारने तीन महिने जेवण, धान्य पुरवठा, मोफत सिलिंडर पुरवले.

सिलिंडर घेण्यासाठीही पैसे नाहीत

दोन वर्षांनंतरही येथील दरडग्रस्तांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. सरकारने त्यांच्याकडे पाठ फिरवली असून दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करावी लागत आहे. आता सिलिंडर घेण्यासाठी पैसेच नसल्याने आदिवासी महिलांवर स्वयंपाकासाठी सरपण वापरण्याची वेळ आली आहे.

सातबारा नसल्याने योजनांचा लाभ नाही

ठाण्यातील एका सामाजिक संस्थेने दरडग्रस्तांच्या मुलांना दत्तक घेण्याचे आश्वासन दिले होते. पण ते हवेत विरले आहे. आपले आईवडील गमावलेली ही मुले सध्या डोलवली व नेरे येथील आश्रमशाळेत शिकत आहेत. आठ तरुणांना सिडकोमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरी मिळाली. पण निम्म्याहून अधिक तरुण बेरोजगार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरडग्रस्तांच्या नावावर सातबारा नसल्याने त्यांना सरकारी योजनांचा लाभही घेता येत नाही.