
रेल्वे गाड्यांतील खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर आयआरसीटीसीने कारवाईसाठी ठोस पावले उचलली आहेत. आयआरसीटीसीच्या शीघ्र कृती पथकाने (क्यूआरटी) पश्चिम विभागातील विविध रेल्वे गाड्यांमध्ये अचानक तपासणी केली आणि तेथील खानपानाची झडती घेतली. या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनधिकृत विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्यात आली.
कॅटरिंग सेवांमधील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल आयआरसीटीसीकडून घेण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि अधिकृत खानपान सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार आयआरसीटीसीने केला आहे. त्याचअनुषंगाने निर्धारित मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी शीघ्र कृती पथकाने पश्चिम विभागातील विविध गाड्यांमध्ये तपासण्या केल्या. या मोहिमेदरम्यान कर्मचारी नियुक्ती, गणवेश आणि ओळखपत्रांबाबत काही अनियमितता आढळून आल्या. त्याची गंभीर नोंद घेत तत्काळ कारवाई करण्यात आली. ट्रेन क्रमांक 22938 मध्ये दोन अनधिकृत विक्रेते निर्धारित गणवेश आणि वैध ओळखपत्रांशिवाय कार्यरत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सेवा पुरवठादाराविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली. तसेच ट्रेन क्रमांक 12480 मध्ये दोन कॅटरिंग कर्मचारी निर्धारित गणवेश आणि वैध ओळखपत्रांशिवाय कार्यरत असल्याचे आढळले. त्याविरोधातही कठोर पाऊल उचलत निर्धारित नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
– खानपान सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना वैध क्यूआर कोडयुक्त ओळखपत्र, निर्धारित गणवेश आणि इतर सर्व केटरिंग नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोणतीही अनियमितता आढळल्यास तत्काळ दंडात्मक आणि सुधारात्मक कारवाई केली जाईल, असे आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबईचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंह यांनी सांगितले.

























































