
शेअर बाजारात आज इंडियन रेल्के कॅटरिंग आणि टुरिझम (आयआरसीटीसी)ची बंपर लिस्टिंग झाली. मुंबई शेअर बाजारात आयआरसीटीसीचा शेअर 320 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 101.25 टक्के प्रीमियमसह 644 रुपयांवर लिस्टिंग झाला. शेअर बाजारात कोणत्याही सरकारी कंपनीच्या लिस्टिंगमधील ही यशस्वी लिस्टिंग आहे. शेअर बाजारात आयआरसीटीसी नोंदणीकृत झाल्यानंतर कंपनीचे भांडवल (एमकॅप) हे 10 हजार 736 कोटी रुपये झाले आहे.
मागील दोन वर्षांत शेअर बाजारातील हे जबरदस्त लिस्टिंग आहे. आतापर्यंत झालेल्या कोणत्याही शेअर्सला दुप्पट रक्कम मिळाली नव्हती. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास आयआरसीटीसीचा शेअर 40 अंकांनी वधारून त्याची किंमत 684 रुपये झाली होती.
12 टक्के हिस्सा सरकार किकणार
केंद्र सरकार आयआरसीटीसीचे निर्गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी आयआरसीटीसीचे शेअर विकण्यात येत आहे. सध्या आयआरसीटीसीमध्ये केंद्र सरकारचा 100 टक्के हिस्सा आहे. केंद्र सरकार आता 12 टक्के शेअर्स किकणार आहेत. आयपीओनंतर केंद्र सरकारची आयआरसीटीसीमध्ये मालकी 100 टक्क्यांहून 87.7 टक्के इतकी राहणार आहे.























































