आसुद धरण पुलावरील लोखंडी पाइपमुळे वाहतुकीला अडथळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसुद येथील धरण स्टॉपवर यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एका नव्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाली असली, तरी विद्युत महावितरणने विद्युत वाहिन्यांना आधार देण्यासाठी पुलावर उभ्या करून ठेवलेल्या एका लोखंडी पाइपमुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

दापोली हर्णे मार्गावरील आसुद येथून वाघवे या गावाकडे जाणाऱ्या जुन्या रस्त्याचे रूपडे पालटून या मार्गाचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर धरण स्टॉप येथील नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावरून वाहतूक सुरू होण्यास काहीही अडचण नसताना विद्युत प्रवाह खंडित असलेल्या विद्युतवाहिन्यांच्या आधारासाठी विद्युत महावितरणने एक लोखंडी पाईप आधार म्हणून पुलाच्या मधोमध उभा करून ठेवला आहे. हा आधार म्हणून उभा केलेला लोखंडी पाईप इतर वाहनांच्या रहदारीसाठी अडथळा ठरत आहे. या महत्त्वाच्या समस्येकडे सार्वजनिक बांधकामाचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे पुलावरील वाहतूक ही अडथळ्यांची शर्यतच ठरत आहे.

या पुलावर प्रकाशाची कोणतीही सोय नसल्याने पुलावरून रात्रीच्या वेळेस जाणे झाल्यास पुलावर विद्युत तारांसाठी उभा केलेला लोखंडी पाईपचा आधार धोक्याचा ठरत आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अखत्यारीतील हा मार्ग सुरळीतपणे आणि वाहतूक विना अपघात सुरू राहण्यासाठी लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी येथील पादचाऱ्यांनी केली आहे.