
सामना ऑनलाईन, अहमदाबाद
गुजरातमध्ये साबरकांठा भागात १४ महिन्यांच्या बाळावर बलात्कार केल्याबद्दल बिहारच्या रवींद्र साहूला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गुजरातमध्ये परप्रांतीयांबद्दल जबरदस्त संतापाची लाट उसळली असून तिथल्या विविध भागात परप्रांतीयांवर हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांचं प्रमाण गांधीनगर, अहमदाबाद, पाटण, साबरकांठा आणि मेहसाणा या पाच राज्यात सगळ्यात जास्त आहे. परप्रांतीयांना दिसेल तिथे चोपल्याबद्दल आत्तापर्यंत १८० जणांना अटक करण्यात आली आहे. परप्रांतीयांवरील या हल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचं बोललं जातंय.
ज्या बाळावर बलात्कार झाला त्या बाळाचे आईवडील ठाकोर समुदायाचे आहेत. यामुळे ठाकोर समुदायातील व्यक्तींनी परप्रांतीयांवर हल्ले करायला सुरुवात केले असून अनेक परप्रांतीयांनी भीतीने गुजरात सोडायला सुरूवात केली आहे. अल्पेश ठाकोर हे ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे या हल्ल्यांपाठी त्यांची महत्वाची भूमिका असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय. अल्पेश ठाकोर यांना मात्र हा आरोप मान्य नाही. आमच्याकडून हल्ले करण्यासंदर्भात कोणतेही आदेश दिलेले नाहीत आणि ज्या अफवा उठतायत त्या ठाकोर सेनेला बदनाम करण्यासाठी उठत असल्याचं अल्पेश यांचं म्हणणं आहे.



























































