हा तोच महाराष्ट्र आहे काय? आता त्यांचे आक्रोश मोर्चे कुठे गेले? अशोक खरात प्रकरणी अंबादास दानवे यांचे सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यासह देशभरात सध्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण गाजत आहे. त्याचे अनेक कारनामे उघड होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला आहे. हा तोच महाराष्ट्र आहे काय? आता त्यांचे आक्रोश मोर्चे कुठे गेले? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असे सवाल त्यांनी केले आहेत.

अंबादास दानवे यांनी एक्सवर एक पत्र शेअर केले आहे. ते पत्र त्यांनी महाराष्ट्राचे तमाम राजकीय नेतृत्व आणि समाजधुरिण यांना लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ॥ जय महाराष्ट्र ॥ प्रति, महाराष्ट्राचे तमाम राजकीय नेतृत्व आणि समाजधुरिण, महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारं राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली.

आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत? ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते.

नाशिकमधील या तथाकथित ‘कॅप्टन’ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे ‘आक्रोश मोर्चे’ कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत?

माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला नक्की विचारून पहा, असे दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.