
इंडियन सुपर लीग या हिंदुस्थानातील फुटबॉल स्पर्धेच्या आगामी मोसमाचा बिगूल वाजला. येत्या नोव्हेंबर महिन्यापासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेतील सर्व लढती गोवा या एकाच ठिकाणी होणार आहेत. गोव्यातील तीन स्टेडियममध्ये या लढती खेळवण्यात येणार आहेत. प्रेक्षकांविना पार पडणाऱया या स्पर्धेच्या लढती जवाहरलाल नेहरू स्टेडियम (फार्तोडा), जीएमसी ऍथलेटिक स्टेडियम (बॅम्बोलिम) व टिळक मैदान स्टेडियम (वास्को) या स्टेडियममध्ये होणार आहेत. या स्पर्धेशी निगडित असलेले खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांसह सर्व बाबींच्या आरोग्यासह सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याप्रसंगी फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संस्थापक नीता अंबानी म्हणाल्या, गोव्यामध्ये गेल्या वर्षी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. गोव्यामध्ये फुटबॉलचे वेड प्रचंड आहे. आता आयएसएलचा सातवा मोसम तेथे खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच आनंद होत आहे. तसेच त्या पुढे म्हणाल्या, गेल्या सहा वर्षांमध्ये आयएसएलमुळे हिंदुस्थानातील फुटबॉलचा विकास झाला आहे. जागतिक लीगमध्ये आयएसएलला सदस्यत्व मिळाले. फुटबॉल ग्रुपने मुंबई सिटी एफसीमध्ये गुंतवणूक केलीय. एटीके व मोहन बागान एकत्र आले. सोशल मीडियावरील सर्वाधिक लोकप्रिय लीग म्हणून आयएसएलने चौथ्या क्रमांकावर बाजी मारलीय, असेही त्या पुढे म्हणाल्या.
पिच, फ्लड लाईटस् अन् ड्रेसिंग रूमवर लक्ष
फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट लिमिटेडकडून यावेळी तीन स्टेडियममधील सुविधांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यामध्ये पिचचे अपग्रेडेशन, निचरा वाहून नेण्यासाठीच्या उपायांचे नूतनीकरण, फ्लड लाईटस् आणि खेळाडूंच्या ड्रेसिंग रूम या सर्वांचाच समावेश आहे.
प्रत्येक क्लबसाठी ट्रेनिंगची सुविधा
फुटबॉल स्पोर्टस् डेव्हलपमेंट लिमिटेडकडून प्रत्येक क्लबमधील खेळाडूला ट्रेनिंग करता यावी यासाठी पिचसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पुढील महिन्यात मैदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे, जेणेकरून प्रत्येक क्लबला आपापली ट्रेनिंग करता येईल. मैदानातील सुविधांवर नजर टाकल्यानंतरच ते क्लबकडे सुपूर्द करण्यात येईल.























































