इस्रायलचा इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला; तेल डेपो, गॅस रिफायनरीसह 150 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त 

इस्रायल आणि इराणमधील संघर्ष चिघळला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार हल्ले सुरूच ठेवले असून रविवारी तेहरान येथील संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात आले. तसेच तेल डेपो आणि गॅस रिफायनरीसह इराणच्या अणुपेंद्राशी संबंधित 150 हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली. मागील सलग तीन दिवस सुरू ठेवलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या 138 लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलने इराणच्या अणुपेंद्रांवर लढाऊ विमानांच्या साहाय्याने हल्ले केले. शनिवारी रात्री उशिरा इस्रायलने पुन्हा अनेक क्षेपणास्त्रे डागली. त्यावर इराणनेदेखील क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिल्याने दोन देशांतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर इस्रायली संरक्षण दलाने इराणचे लष्करी शस्त्रास्त्र कारखाने आणि त्या परिसरातील नागरिकांना तत्काळ तो परिसर रिकामा करण्याचा इशारा दिला आहे. शस्त्रास्त्र कारखान्यांजवळ राहणे इराणी लोकांसाठी धोकादायक ठरू शकते, असे  इस्रायलचे कर्नल अविकाय अद्री यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले.

इस्रायलने हल्ले थांबवले, तरच आम्ही शांत बसू – इराणने ठणकावले

इस्रायलच्या हल्ल्यांना तितक्याच ताकदीने इराणकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील युद्ध थांबण्याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. यादरम्यान इराणने आपली रोखठोक भूमिका जाहीर केली आहे. जर इस्रायलने हल्ले करणे थांबवले तर आम्ही प्रत्युत्तर देणे थांबवू, असे इराणने ठणकावले.

हल्ल्यांत दोन्ही देशांत मोठी जीवितहानी

इस्रायलने सलग तीन दिवस सुरू ठेवलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये इराणच्या 138 लोकांचा मृत्यू झाला, तर 350 हून अधिक जखमी झाले आहेत. हल्ल्यांमध्ये नऊ अणुशास्त्रज्ञ आणि 20 हून अधिक इराणी कमांडरचा मृत्यू झाला. इराणची राजधानी तेहरानसह 7 राज्यांत हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर 150 हून अधिक क्षेपणास्त्रs डागली. त्यात 13 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक जण जखमी झाले. इराणने तीन इस्रायली एफ-35 विमाने पाडल्याचा दावा केला आहे.