रमझानसाठी इस्रायल-हमास युद्ध थांबवण्याचा ठराव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुस्लिमांसाठी पवित्र रमजान महिन्यात गाझा पट्टीत युद्धविराम घ्यावा, असा ठराव आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाने 14 वि. 0 मतांनी संमत केला. विशेष म्हणजे, आजवर गाझातील युद्धबंदीविषयी ठरावांना नकाराधिकार वापरून रोखणाऱ्या अमेरिकेने नकाराधिकार न वापरता केवळ अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे इस्रायल नाराज झाले आहे.

गाझातील संघर्ष थांबवण्याविषयीचा हा संयुक्त राष्ट्रांचा पहिलाच ठराव आहे. अमेरिकेने तो न रोखल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी त्यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळाची वॉशिंग्टनची नियोजित भेट तत्काळ रद्द केली. रमझान 8 एप्रिल रोजी समाप्त होत आहे.

या ठरावात हमासने बंदिवान केलेल्या सर्व ओलिसांची सुटका करण्याची मागणीही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. युद्धविराम आणि ओलिसांची सुटका या बाबी संलग्न न केल्यामुळे नेतन्याहू यांनी अमेरिकेने आधीच्या भूमिकेपासून माघार घेतली असल्याचा आरोप केला.

गाझा पट्टीतील रफाह शहरात दहा लाखांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांनी सध्या आश्रय घेतला आहे. याच भागातील हल्ल्यासाठी इस्रायली शिष्टमंडळ व्हाईट हाऊसच्या अधिकाऱयांसमोर एक योजना मांडणार होते.

– या ठरावापासून आम्ही दूर राहण्याचे कारण म्हणजे, या ठरावात हमासचा निषेध केला नाही, असे व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले.

– इस्रायली-हमास संघर्षात तत्काळ आणि कायमच्या युद्धविरामाला समर्थन देणाऱया अमेरिकेने आणलेल्या ठरावाला रशिया आणि चीनने शुक्रवारी नकाराधिकार वापरून अडवले होते.