
अमेरिका, इस्रायल- इराण युद्धाचे परिमाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. नायराने पेट्रोलच्या दरात 5 रुपयेत तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आखातातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या खाजगी इंधन विक्रेता असलेल्या नायरा एनर्जीने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढ जाहीर केली. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ५.३० रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांवरील महागाईचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
या दरवाढीमुळे मुंबईमध्ये पेट्रोल १०३.५४ रुपये, बंगळूरमध्ये १०२.९२ रुपये, भुवनेश्वरमध्ये १०१.१९ रुपये, चेन्नईमध्ये १००.८० रुपये, नोएडामध्ये ९५.१६ रुपये आणि गुरुग्राममध्ये ९५.५७ रुपये प्रति लिटर झाले आहे. तसेच डिझेलचे दरही वाढले आहे. सध्या हैदराबादमध्ये डिझेलचा दर ९५.७० प्रति लिटर, भुवनेश्वरमध्ये ९२.७७, चेन्नईमध्ये ९२.३९, कोलकातामध्ये ९२.०२, बंगळूरुमध्ये ९०.९९, मुंबईमध्ये ९०.०३, नोएडामध्ये ८८.३१ आणि गुरुग्राममध्ये ८८.०३ आहे.
नायरा एनर्जीचे देशभरात ६,५०० हून अधिक पेट्रोल पंप आहेत. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील तेल शुद्धीकरण आणि किरकोळ विक्री जाळे असलेली कंपनी आहे. नायरा एनर्जीने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेली ही वाढ इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आली आहे, जेव्हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) पासून ते भारत पेट्रोलियमपर्यंतच्या सरकारी तेल कंपन्यांनी आधीच प्रीमियम पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत.औद्योगिक डिझेलचे दरही वाढवण्यात आले आहेत, ज्यामुळे उद्योगावरील खर्चाचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
देशभरातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर लोक लांबच लांब रांगा लावून उभे असलेले दिसत आहेत. एलपीजीच्या तुटवड्यामुळे व्यावसायिक गॅस पुरवठा खंडित झाला आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांनाही त्रास होत असून गॅससाठी लांबच लांब रांगा लागत आहेत.



























































