
कारागृहात कैद असलेले दहशतवादी आपल्या वीर्याची तस्करी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे दहशतवाद्यांपासून गर्भवती राहिलेल्या 60हून अधिक स्त्रियांनी अपत्यांना जन्म दिला आहे.
इस्रायलच्या कारागृहांमध्ये उघड झाले प्रकार
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रकार इस्रायलच्या कारागृहांमध्ये होत असल्याचं वृत्त आहे. वास्तविक, इस्रायलच्या कारागृहांमध्ये कैद्यांना त्यांच्या पत्नीसोबत वैवाहिक भेटीची मुभा आहे. या भेटीत दोघांनाही पुरेसा एकांत देण्यात येतो. मात्र, दहशतवादाच्या आरोपाखाली कैद असलेल्यांना ही मुभा देण्यात आलेली नाही.
या दहशतवाद्यांवर अशा भेटींमध्ये हत्यारे, पैसे किंवा अंमली पदार्थांची तस्करी होऊ शकेल, या कारणास्तव बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता दहशतवाद्यांनी नवीन मार्ग शोधून काढला आहे. त्यांनी पत्नींना डबीतून वीर्य द्यायला सुरुवात केली आहे. त्याद्वारे त्यांच्या पत्नी गर्भवती राहत असून त्यांनी मुलांना जन्म दिला आहे.
कशी झाली याची सुरुवात
याची सुरुवात 1986मधील एका प्रकरणातून झाली. 1986मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ द लिबरेशन ऑफ फिलिस्तान या संघटनेच्या काही दहशतवाद्यांनी इस्रायली सैनिक मोशे तमाम याचं अपहरण करून त्याची हत्या केली. या प्रकरणाचा शोध घेताना इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी टीरा शहरातून इस्रायल-अरब वंशाच्या वालिद डक्का याला अटक केली.
दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याने त्याला जन्मठेप झाली होती. जेलमध्ये असताना त्याची भेट इस्रायली महिला पत्रकार साना सलामाशी झाली. ती त्या दरम्यान फिलीस्तानच्या कैद्यांच्या आयुष्यावर लिहित होती. त्यामुळे तिचं कारागृहात वारंवार येणंजाणं होतं. तिच्याशी वालिद याने 1999 साली जेलमध्येच लग्न केलं. या जोडप्याला अपत्याला जन्म द्यायचा होता. मात्र, कारागृहातील नियमांमध्ये हे बसणारं नव्हतं.
त्यामुळे सर्वात प्रथम सानानेच वीर्य तस्करी केली असावी, असा अधिकाऱ्यांना संशय आहे. 2012मध्ये साना गर्भवती झाली होती. त्यानंतर 2018पर्यंत जवळपास 60 हून अधिक महिलांनी वीर्य तस्करीच्या साहाय्याने मुलांना जन्म दिला आहे. या सर्व महिला फिलिस्तानी दहशतवाद्यांच्या पत्नी असून त्यांचे पती वेगवेगळ्या कारागृहांमध्ये कैद आहेत.



























































