
इराण-इस्रायल युद्ध संपल्यानंतर आता दोन्ही देशांतील नुकसानीच्या व एकमेकांविरोधातील कट-कारस्थानांच्या कथा बाहेर येत आहेत. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांना संपवण्यासाठी इस्रायलने नसरल्लाह पॅटर्न वापरला होता. हा हल्ला फसल्याने पेजेश्कियान थोडक्यात बचावले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
एका न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, इराण-इस्रायलमध्ये युद्ध भडकल्यानंतर चार दिवसांनी पेजेश्कियान हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सहभागी झाले होते. ज्या इमारतीत ही बैठक सुरू होती, त्या इमारतीवर एक क्षेपणास्त्र आदळले. या हल्ल्यात पेजेश्कियान यांच्या पायाला दुखापत झाली, मात्र त्यांचा जीव वाचला.
काय आहे नसरल्लाह पॅटर्न?
इस्रायलने हल्ल्याच्या नवनव्या पद्धती विकसित केल्या आहेत. नसरल्लाह पॅटर्नमध्ये टार्गेट ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणाला लक्ष्य केले जाते. हल्ल्यानंतर पळापळ झाली की त्या इमारतीच्या एण्ट्री आणि एक्झिट पॉइंटना लक्ष्य करून क्षेपणास्त्रांचा मारा केला जातो. हा पॅटर्न इस्रायलने पहिल्यांदा बैरूतमध्ये वापरला होता. बैरूतमधील हिजबुल्लाहचा नेता हसन नसरल्लाह यांची अशाच प्रकार हत्या केली होती.