ISRO 2022.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपूर्वा जाखाडी ,[email protected]

2022 साली इस्रो अंतराळात माणूस पाठवणार आहे. काय आहे ही मोहीम…

अवकाशात भ्रमंती करायला कोणाला आवडणार नाही… मानवाची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे… कारण हिंदुस्थानी अवकाश संशोधन म्हणजेच इस्रो यासंदर्भात संशोधन करत आहे…

माणूस पृथ्वीवर राहतो, त्याप्रमाणे इतर ग्रहावरही राहण्याची त्याची तयारी व्हावी याकरिता 2022 पर्यंत मानवाला प्रथमच अवकाशात पाठवण्याची मोहीम इस्रोतर्फे राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी देशातील सर्वात जास्त वजनाचे रॉकेट वापरले जाणार आहे. या रॉकेटचे वजन 640 टन असून उंची 43 मीटर आहे. याचे यशस्वी प्रक्षेपण गेल्या वर्षी झाले होते. त्या वेळी पाच जंबो जेट किंवा 200 हत्तींच्या वजनाचे रॉकेट असे याचे वर्णन झाले होते. त्यामुळे पृथ्वीच्या कक्षेत 2000 किलोमीटर उंचीवर हे प्रक्षेपित होऊ शकते. त्यामुळे अवकाशात अंतराळवीर सोडण्यासाठी हे वजन पुरेसे आहे, असे संशोधकांना वाटते.

अवकाशात माणूस पाठवणे हे काळाच्या पुढचे पाऊल म्हणावे लागेल. आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी अंतराळात माणूस पाठवला आहे. हिंदुस्थान या मोहिमेत यशस्वी ठरला, तर अवकाशात माणूस पाठवणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरेल. या मोहिमेचे खरे आव्हान म्हणजे अंतराळवीरांना अर्थात मानवाला अवकाशात जाण्यासाठी द्यावे लागणारे प्रशिक्षण. याशिवाय अंतराळात जिवंत राहाण्यासाठी आवश्यक ती ‘लाईफ सपोर्ट सिस्टीम’ विकसित करणे, हे सगळय़ात मोठे ध्येय सध्या संशोधक आणि शास्त्र्ाज्ञांपुढे आहे. यासाठी अनेक संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.

मंगळावर जाण्याचा हा पहिला टप्पा असून वेगवेगळय़ा क्षेत्रांतल्या मंडळींना या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. अंतराळात पाठवण्याची मानवाची क्षमता विकसित करणे, पृथ्वीच्या बाहेर माणसांच्या वसाहती स्थापन करणे, मानवाला अंतराळातील वास्तव्याचा अनुभव करून देणे, त्यासाठी लागणारा पोषाख, सभोवतालची यंत्रे, गुरुत्वाकर्षणामधला प्रवास, अवकाशातले उड्डाण, तिथे वापरायच्या वस्तू, जाताना तसेच परतीचा प्रवास अशा सर्वच स्तरावर इस्रो संशोधन करत आहे.

मानवजातीसाठी मोठी झेप

नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर 50 वर्षांनी मानवाला अवकाशात पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नील यांनी 20 जुलै 1969 साली चंद्रावर पाऊल ठेवले होते. विज्ञान या विषयात करीयर करणाऱया विद्यार्थ्यांना या संशोधनाचा फायदा होईल. पृथ्वीवर ज्याप्रमाणे वेगवेगळी स्थानके, वसाहती आहेत त्याप्रमाणे चंद्र आणि मंगळावर अशा वसाहती निर्माण करणे, अंतराळ आणि पृथ्वीवरील मानवाला एकमेकांशी संपर्क करता येणे, अवकाशातल्या वेगळय़ा वातावरणाचा मानवाला फायदा करून देणे, त्या वातावरणाची त्याला सवय होण्यासाठी मदत करणे त्याकरिता आधी यंत्रमानवाद्वारे हे सगळे प्रयोग करणे. त्यानंतर प्रत्यक्ष मानवाला अवकाशात पाठवणे असे अनोखे संशोधन सध्या संशोधकांमार्फत सुरू आहे. म्हणूनच मानवजातीसाठी ही मोठी झेप आहे.

मुलींसाठी संधी

मानवाला अवकाशात पाठवण्याच्या मोहिमेत हवाईसुंदरी, इंजिनीअर, डॉक्टर, वकील, वैमानिक, खेळाडू अशा वेगवेगळय़ा क्षेत्रांत करीयर करणाऱया मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी, व्यायाम, इस्रोच्या या मोहिमेबाबत समाजात जनजागृती करणे, स्त्रियांना अवकाशात राहण्याची सवय होण्यासाठी प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी स्पेससूट म्हणजे अवकाशात जाताना घालायचा कोट तयार करणे, अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱयाही पार पाडल्या जाणार आहेत.

भविष्यकालीन योजना

मार्च 2019 पूर्वी इस्रो 19 अंतराळ मोहिमा पूर्ण करणार आहे.  चांद्रयान-2 मोहीम जानेवारी महिन्यात पार पडणार आहे.

जानेवारी 2019 मध्ये जीएसएलव्ही-एमके-3-एम 1 माध्यमातून चांद्रयान-2 चे प्रक्षेपण केले जाईल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जाणारे हे पहिले यान असेल.

इस्रो स्वतःचे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्याचा प्रयत्न करणार आहे. हिंदुस्थानच्या चांद्रयान-1 मोहिमेने पहिल्याच प्रयत्नात चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. चांद्रयान-2 या मोहिमेचा पुढील टप्पा आहे.

चांद्रयान-2 ही हिंदुस्थानची चंद्राकरता दुसरी मोहीम आहे. चांद्रयान-2च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाशी संबंधित माहिती मिळवली जाणार आहे. या चंद्र मोहिमेसाठी स्वतःचा सर्वात अवजड अग्निबाण बाहुबलीचा वापर केला जाणार आहे.

(लेखिका नासा-हनीवेल अंतराळ प्रशिक्षक आहेत)