
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
इस्रोच्या अंतराळ मोहीमा काही काळ थंडावल्या होत्या. आता इस्रो या मोहिमांना गती देणार आहे. सात महिन्यांमध्ये 19 नवीन मिशन सुरू करण्यात येणार आहेत. त्यात चांद्रयान 2 चाही समावेश आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात सप्टेंबरपासून होणार आहे.
इस्रो सात महिन्यात 19 अभियानं राबवणार आहे. त्यात 10 सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी दिली. सप्टेंबर ते मार्च या महिन्यात या मोहिमा राबवण्यात येणार आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. त्यासाठी एका महिन्यात दोन उपग्रह प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एवढ्या कमी वेळात इस्रो पहिल्यांदा मोठ्या संख्येने उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. पीएसएलव्ही सी 42 च्या प्रक्षेपणाने 15 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात बाहुबली नावाने जीएसएलव्ही एमके 3- डी 2 या चार टनचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेल्या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच पीएसएलव्ही सी 43 याचेही प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. हवाई दलासाठी महत्वाच्या असलेल्या जी सॅट 7 ओ आणि जी सॅट 11 या उपग्रहांचे नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 44 आणि जीसॅट 31 अंतराळात सोडण्यात येणार आहेत.
2019 या नवीन वर्षात इस्रोची बहुप्रतीक्षीत चांद्रयान 2 मोहीम 3 ते 16 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहे. त्याच महिन्यात इस्रो पीएसएलव्ही सी 45 द्वारे रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट रिसॅट 2 बी अंतराळात सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारीमध्ये पीएसएलव्ही सी 46 द्वारे दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. तर मार्च महिन्यात रिसॅट 2 बीआर1. रिसॅट 2 बी यासह दोन इतर उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Summary- Isro will launch 19 missions in 7 months.


























































