
हिंदुस्थानचा अनुभवी नेमबाज रविंदर सिंगने ‘आयएसएसएफ’ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत शनिवारी पहिल्याच दिवशी इतिहास रचला. त्याने ५० मीटर फ्री पिस्टल स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले, तर संघ स्पर्धेत हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले.
जम्मू-कश्मीरमधील बिश्नाह गावचा रहिवासी असलेल्या २९ वर्षीय रविंदरने ५६९ गुण मिळवीत सुवर्णपदकावर कब्जा केला. दक्षिण कोरियाच्या किम चेयोंगयोंग याने ५५६ गुणांसह रौप्यपदक जिंकले, तर रशियाच्या अॅण्टन एरिस्टारखोवने समान गुणांसह कांस्यपदक पटकाविले.
रविंदर सिंगची ही कामगिरी कारकिर्दीतील सर्वांत मोठी उपलब्धी ठरली. यापूर्वी त्याने २०२३मध्ये बाकू येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. यंदा त्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टलमध्ये रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेत ४७ नेमबाज सहभागी झाले होते.
सांघिक स्पर्धेत रौप्य
संघ स्पर्धेत हिंदुस्थानच्या रविंदर (५६९), कमलजीत (५४०) आणि योगेश कुमार (५३७) या तिकडीने एकूण १६४६ गुण मिळवून रौप्यपदक पटकाविले. दक्षिण कोरियाने १६४८ गुणांसह सुवर्ण, तर युक्रेनने १६४४ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
























































