
आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ करण्यासाठी आयटीआय प्रवेश शाळांशी जोडण्याचा निर्णय व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. आयटीआय प्रवेशासाठी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या थेट शाळेत उन्हाळी सुट्टीनंतर मार्गदर्शन केले जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्कूल कनेक्ट हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय आयटीआयमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. कोरोना काळामुळे गेल्या दोन वर्षांपूर्वी आयटीआय अभ्यासक्रमांचे प्रवेश कमी झाले होते. त्या तुलनेत गेल्या शैक्षणिक वर्षात प्रवेशात मोठी वाढ झाली. शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 763 आणि खासगी आयटीआय मध्ये 56 हजार 436 अशा एकूण 1 लाख 50 हजार 199 अशा सर्व कोटय़ासह प्रवेशासाठी जागा आहेत. या जागांवर सुमारे 86 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी (92 टक्के) तर खासगी आयटीआयमध्ये 31 हजार (56 टक्के) प्रवेश घेतले आहेत.


























































